रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रायगड जिल्हा आढावा बैठक

मुंबई, दि. 3 : रायगड जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना नोटीस बजावून कामे पूर्ण करावीत तसेच जी कामे सुरू झाली नाहीत, अशा कंत्राटदारांनाही नोटीस देऊन पुन्हा निविदा प्रक्रिया राबवून कामाला गती द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा बैठकीत दिल्या.

विधानभवनात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार सर्वश्री भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अनिकेत तटकरे, प्रशांत ठाकूर उपस्थित होते.

श्री.ठाकरे म्हणाले, जलसंधारणाच्या अडचणीसंदर्भात स्वतंत्र समिती गठित करून पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा. तसेच याबाबत काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळून बाकी गुन्हे माफ करण्यासंदर्भात शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

बैठकीत राज्यमंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या, कोकणातील मत्स्य व्यावसायिकांसाठी मत्स्य दुष्काळ जाहीर करून त्यांचा कर्जमाफी योजनेत समावेश करावा. तसेच त्यांना डिझेल परवाना लवकर मिळवून देण्यात यावा, स्पीड बोट, रुग्णवाहिका सेवा सुरु करावी. २३ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समावेशन नगरपंचायतीमध्ये करावे, अशा सूचनाही कुमारी तटकरे यांनी केल्या.  

बैठकीत रायगड जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर रस्त्यांची सद्यस्थिती, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प, कृषी पंपासाठी पुरेसा वीजपुरवठा, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या, आरोग्य सुविधा, अमृत योजना, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन, रोरो सेवेसाठी पार्किंग सुविधा, आरोग्य विभागातील रिक्त पदे, मुद्रांक शुल्क रक्कम, रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्याची स्थिती व दुरुस्ती या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/3.3.2020