विधानसभा प्रश्नोत्तरे

सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी

सोडविण्यासाठी जलद गतीने कार्यवाही करणार

– नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 3 : मंत्रिमंडळ पायाभूत समितीने सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून तुर्भे ते खारघर भुयारी मार्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.  ठाणे-पनवेल वाहतूक, जेएनपीटीकडे जाणारी वाहतूक यांची कोंडी होत असल्याने ती सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून त्याबाबत जलद गतीने कार्यवाही सुरू असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.

तुर्भे ते खारघर या भुयारी मार्गाच्या कामाबाबत सदस्य गणेश नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना मंत्री श्री.शिंदे बोलत होते.

श्री.शिंदे म्हणाले, ठाणे-पनवेल-एक्सप्रेस वे – जेएनपीटी या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासन कार्यरत आहे. यासाठी प्रकल्प मेसर्स स्टुप कन्सलल्टंट प्रा.लि. यांनी या प्रकल्पाची पूर्व सुसज्जता तपासण्यासाठी त्यांची नेमणूक केली. प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित प्रकल्पातील नऊ आराखड्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी एका प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एमआयडीसी, एमएसआरडीसीने, सिडको यांनी ६०० कोटी आणि उर्वरित ६२२कोटी कर्जरूपाने उभे करण्यात येणार आहे. हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी सर्व सोयींनी युक्त अहवाल जलद गतीने सादर करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

०००

झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत  सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देणार – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 3 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत सुरू असलेले प्रकल्प निधीअभावी अपूर्ण राहणार नाहीत. मुंबईत विविध प्राधिकरणाच्या माध्यमांतून प्रकल्प राबविले जातात त्यांच्यात समन्वय साधण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, या कामांना गती देण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पातून स्थानिक स्वराज्य संस्थांना देय असलेली रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य संजय पोतनीस यांनी मुंबईतील पायाभूत सुविधा शुल्कापोटी जमा होणाऱ्या रकमेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. शिंदे बोलत होते.

मंत्री श्री.शिंदे म्हणाले, मुंबईत एमएमआरडीच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबविले जातात. भांडवली खर्चापैकी १६ हजार ६६४ कोटी एवढी रक्कम मुंबई महानगरपालिकेकडून एमएमआरडीएला येणे अपेक्षित आहे. या रकमेतून झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत एमएमआरडीएकडून ८८.७५कोटी रक्कम मुंबई महानगर पालिकेला येणे अपेक्षित आहे. असे असल्याने ही रक्कम वजा करून उर्वरित रक्कम देण्यासाठी प्राधिकरणाने विनंती केली आहे. त्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

मुंबई शहरात एसआरए, मेट्रो, एमएसआरडीसी, मोनो, एमएमआरडीए अशी विविध आठ प्राधिकरणे काम करीत आहेत. शासनाच्या अंतर्गत असलेले हे प्राधिकरण असून, लोकांना पायाभूत सुविधा मिळावयाला हव्यात यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी या विविध प्राधिकरणांमध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे कामास गती मिळणार आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री आशिष शेलार, भास्कर जाधव, रविंद्र वायकर, योगेश सागर, प्रताप सरनाईक यांनी भाग घेतला.

०००

पत्राचाळीतील 672 कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी

जलद गतीने प्रकल्प उभारणार – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

मुंबई, दि. 3 : सिद्धार्थ नगर गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना मासिक भाडे म्हाडामार्फत देण्यात येईल. यासंदर्भात विकासकावर आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. विधी व न्याय विभागाकडे हे प्रकरण देण्यात येईल. कायदेशीर बाजू तपासून या चाळीतील६७२कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी प्रकल्प उभारण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानसभेत दिली.

सिद्धार्थनगर गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत सदस्य विद्या ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. आव्हाड बोलत होते.

श्री.आव्हाड म्हणाले, सिद्धार्थ नगर गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत सेवानिवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे समितीचा निर्णय येण्यास विलंब होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तात्काळ या पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार असून,६७२रहिवाशांना न्याय देण्याचे काम शासन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

श्री.आव्हाड म्हणाले, ६७२रहिवाशांना विकासकामार्फत मासिक भाडे नियमाप्रमाणे म्हाडा अदा करेल. या गृहनिर्माण संस्था गुरूआशिष कं.प्रा.लि. आणि म्हाडामार्फत करण्यात येणार होत्या. मात्र, विकासकाने नियम आणि अटींचा भंग केल्याने आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदविला असून, विकासकास अटक करण्यात आली आहे. या विकासकाला ही मालमत्ता मिळू नये यासाठी म्हाडा प्रयत्न करीत आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य रविंद्र वायकर, सुनिल प्रभू यांनी भाग घेतला.

०००

श्रद्धा मेश्राम/3.2.2020

रस्त्यांची कामे कालमर्यादेत, गुणवत्तेने न झाल्यास कंत्राटदारांवर कारवाई

– सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण

मुंबई दि. 3 : खडकवासला येथील सिंहगड रस्ता, नांदेडपासून पानशेत आणि वेल्हापर्यंतच्या विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. किरकिटवाडी व खडकवासला येथील गावातील रस्त्याची लांबी ११८.७० किमीची असून हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत काम सुरू आहे. या रस्त्याचे काम ३० टक्के पूर्ण झाले असून, सप्टेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येईल. ही कामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण कामे न केल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्व. उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी विधानसभेत दिली.

खडकवासला येथील रस्त्यांच्या कामासंदर्भात सदस्य माधुरी मिसाळ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. चव्हाण बोलत होते.

यावेळी झालेल्या चर्चेतील उपप्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक वाहिन्या स्थलांतरित करून काम करावे लागत असल्याने, गतीने काम करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. वाहतूक सुरक्षेची उपाययोजना करून व वाहतूक नियंत्रित करणे पण आवश्यक असून, कामे गुणवत्ता राखून पूर्ण जलद गतीने करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री श्री. भरणे यांनी दिली.

श्री. अशोक चव्हाण म्हणाले, किरकिटवाडी व खडकवासला या एकूण रस्त्याची लांबी ७६.१६ किमी पैकी २४.२२ किमी लांबीचे काम पूर्ण असून ११.४६ किमी लांबीत काम प्रगतीत आहे. गावांतील लांबी ही ११.७० किमी असून त्यापैकी ३.६५ किमी लांबीतील काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सप्टेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री संग्राम थोपटे, भीमराव तापकीर यांनी सहभाग घेतला.

000

आकुर्ली प्रसूतिगृहाच्या कामास सहा महिन्यात गती देणार

– नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

मुंबई, दि. 3  :  कांदिवली येथील प्रसूतिगृह प्रशस्त व सुसज्ज बांधण्यात यावे यासाठी जागेचे आरक्षण बदलण्यात आले नसून, रचना बदलण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यात कामास गती देण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे  यांनी विधानसभेत दिली.

कांदिवली पूर्व आकुर्ली रोड येथील महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहाच्या दुरुस्तीबाबत सदस्य अतुल भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना राज्यमंत्री श्री. तनपुरे बोलत होते.

राज्यमंत्री श्री. तनपुरे म्हणाले, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकुर्ली प्रसूतिगृहाची पुनर्बांधणी करण्यात येणाऱ्या भूखंडावर चार प्रकारचे आरक्षण असून, त्यांचा आकार असमान असल्यामुळे विकास करणे कठीण जात होते. या चारही आरक्षणाची योग्य आकारात पुनर्रचना करून प्रसूतिगृहाच्या आराखड्यास मंजुरी देण्याचे काम सुरू आहे. प्रसूतिगृह दामूपाडा क्षेत्रातील महानगरपालिकेच्या इमारतीत हलविण्यात आले असून, प्रसूतीविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी दिली.

००००