जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची दर महिन्याला लोकांसमवेत बैठक घेण्याच्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना

1
6

जनता दरबारच्या धर्तीवर होणार आयोजन

मुंबई, दि.29 : तालुक्यातील जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी11वाजता गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात बैठक आयोजित करण्याचे निर्देश शासन परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबारच्या धर्तीवर अधिकाऱ्यांना या विशेष सूचना केल्या आहेत.

प्रत्येक शुक्रवारी होणाऱ्या या सभेत जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणी सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सभेबाबत ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीमध्ये आलेल्या लेखी तक्रारीतील सर्व तक्रारदारांना सभेपूर्वी 8 दिवस आधी माहिती देण्यात येणार आहे. या सभेअंतर्गत होणाऱ्या कार्यवाहीचा तपशील संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्याच्या सूचना देखील परिपत्रकात करण्यात आल्या आहेत. लोकांना या बैठकीस उपस्थित राहून थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे आपल्या अडचणी मांडता येणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या बैठकीच्या माहितीचे संकलन करायचे आहे. ही संकलित माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठवायची असून, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या सर्व माहितीचा तपशील ग्रामविकास मंत्री आणि ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे सादर करायचा आहे. त्यामुळे राज्यभरात होणाऱ्या या बैठकांचे नियंत्रण थेट मंत्री आणि सचिव स्तरावरुन केले जाणार आहे.

जनेतच्या प्रश्नांबाबत शासन संवेदनशील असून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक तातडीने होण्याच्या दृष्टीने या सूचना देण्यात आल्या आहेत. जनता आणि पंचायत समिती यांच्यामधील संवाद वाढणेही आवश्यक असून या बैठकीच्या माध्यमातून लोकांना ती संधी प्राप्त होऊ शकेल. गटविकास अधिकाऱ्यांनी या बैठका चांगल्या प्रकारे घेऊन लोकांच्या अडचणींना प्रतिसाद द्यावा,अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचा मी स्वत: आढावा घेणार असून लोकांनी याचा लाभ घेऊन गटविकास अधिकाऱ्यांशी संवाद साधावा,असे आवाहन मंत्री श्री.मुश्रीफ यांनी केले आहे.

0000

इर्शाद बागवान/विसंअ/दि.२९.०२.२०२०

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here