सांगली, दि. १५ : शासकीय रूग्णालयांमध्ये कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. याचा सविस्तर आढावा घेऊन यावर मार्ग काढण्यासाठी कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता यांनी तात्काळ प्रस्ताव तयार करावा व तो मंत्रालय स्तरावर सादर करावा. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात सद्यस्थितीत ५ हजार ७८८ एकूण कोरोना बाधित असून यातील २ हजार ५१७ कोरोना बाधित उपचाराखाली आहेत. तर ३ हजार ७० रूग्ण बरे झाले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात तुलनेने प्रादुर्भाव जास्त आहे. या सर्व बाबींचा आढावा घेऊन सद्यस्थितीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी सविस्तर चर्चा केली. सांगलीत उभारण्यात येत असणारे ऑक्सिजन प्लँट व मिरज येथील ऑक्सिजन प्लँटची क्षमता वृद्धी याबाबतही चर्चा करून पालकमंत्री जयंत पाटील यांनी अधिग्रहित रूग्णालयांमधून रूग्णांकडून जादा दराने बिलांची आकारणी होऊ नये यासाठी प्रत्येक खाजगी रूग्णालयांवर शासकीय ऑडिटर नेमून खात्री करावी. रूग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा चांगला असावा. रूग्ण मृत झाल्यास स्वॅबचा अहवाल येण्यामध्ये होत असलेला विलंब कमी करावा याबाबत निर्देशित केले.