एकजुटीच्या बळावर कोरोनावर मात करु – पालकमंत्री बच्चू कडू

अकोला, दि. १५ – कोविड १९ या विषाणू संसर्गाच्या जागतिक संकटाचा आपण अभूतपूर्व एकजुटीने सामना करत आहोत. त्यामुळे या संकटावर आपण नक्कीच मात करु, असा ठाम विश्वास पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याचा ७३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, विधानपरिषद सदस्य आ. गोपिकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पोलीस दलाच्या वाद्यवृंदाने वाजविलेल्या राष्ट्रगिताच्या धुनवर राष्ट्रगीत गायन करुन उपस्थितांना आपल्या राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांनी यावेळी सामाजिक अंतर राखले होते. त्यानंतर आपल्या मार्गदर्शनात पालकमंत्री श्री. कडू यांनी देशासाठी स्वातंत्र्य संग्रामात त्याग आणि बलिदान केलेल्या हुतात्मे, स्वातंत्र्य सैनिक यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केले. ते पुढे म्हणाले, कोविड १९ या विषाणू संसर्गाच्या जागतिक संकटाचा आपण अभूतपूर्व एकजुटीने सामना करत आहोत. त्यामुळे या संकटावर आपण नक्कीच मात करु, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संकटकाळात सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्रशासनातले कर्मचारी- अधिकारी या साऱ्यांनी दाखवलेल्या अतुलनीय कार्यशक्तीचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

ते म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे यासाठी उद्योगपूर्ण गाव ही योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मा यांचे स्मरण राहण्यासाठी पुस्तकरुपी संकलन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. कोरोना संकटावर मात करताना सर्व अधिकारी कर्मचारी, आरोग्य व प्रशासन यंत्रणा यांच्या अथक परिश्रमातून अकोला जिल्हा राज्यात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचा दर असणारा जिल्हा म्हणून ओळखला जात आहे, याबद्दल त्यांनी कौतूक केले. एकजुटीने कोरोना विरुद्धचा लढा आपण जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी समारंभास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, कोविड योद्धा यांची भेट घेतली.

अनाथ व दुर्धर आजारग्रस्त बालकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वितरण

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील अनाथ व दुर्धर आजारग्रस्त बालकांना विशेष साहाय्य योजनेच्या लाभाच्या अनुदानाचे वितरण पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय ध्वजारोहणाच्या मुख्य सभारंभानंतर लगेचच जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात हा कार्यक्रम झाला.

यावेळी अकोला तालुक्यातील आनंद आश्रम, गुडधी, सुर्योदय बालगृह मलकापूर, गायत्री बालिकाश्रम, मलकापूर येथील ११ बालक तसेच सात दुर्धर आजारग्रस्त बालकांना या लाभांचे वितरण करण्यात आले.

अनाथांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध

शासनाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करुन त्याचा लाभ अनाथ मुलांना देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सांगितले. माधवनगर येथील शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व शासकीय मुलांचे बालगृह येथे भेट दिल्यावर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पालकमंत्री श्री. कडू यांनी बालगृहाला भेट देऊन तेथील मुलांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्या. मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे सांगून शासनाच्या विविध योजना एकत्रीकरण करुन त्यासंबंधीचा अहवाल त्वरित सादर करावा. यासाठी शासन आपल्याला योग्य ते सर्व सहकार्य करेल. विद्यार्थ्यांचा अभ्यासातील कल लक्षात घेता त्याप्रमाणे त्यांना शिक्षण देऊन स्पर्धा परीक्षा तसेच ज्यांना उद्योगाकडे वळायचे आहे, अशांना उद्योग करण्याचे शिक्षण द्यावे. अनाथांना योग्य शिक्षण तसेच सोयीसुविधा उपलब्ध करुन देऊन येत्या काही वर्षात त्यांना देशाचे सक्षम नागरिक बनवण्यासाठी त्यांच्यावर योग्य संस्कार करावे, असेही ते म्हणाले.

अकोला थॅलेसिमीया सोसायटीला भेट

‍पालकमंत्री श्री. कडू यांनी अकोला थॅलेसिमीया सोयायटी व डे केअर सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, थॅलेसिमीया सोसायटीचे अध्यक्ष व माजी नगरध्यक्ष हरिश अलीमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे, नगरसेवक आशिष पवित्रकार, नुतन जैन, डॉ. विनीत वर्टे, डॉ. चंदन मोटवाणी होते.

सामाजिक बांधिलकी समजून थॅलेसिमियाचे उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री श्री. कडू यांनी केले. अलीमचंदानी सारखे रंजल्या गांजल्याची सेवा करणारे व्यक्ती खरच समाजातील देव आहे. अशा व्यक्तीचा आदर्श ठेऊन समाजातील प्रत्येक व्यक्तीने थॅलेसिमियासारख्या आजारासाठी सढळ हातानी सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. थॅलेसिमिया हा आजार आनुवंशिक आजार असल्यामुळे लग्न करताना कुंडली न बघता थॅलेसिमियाची चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. यामुळे समाजात थॅलेसिमीया आजाराचा फैलाव होणार नाही. यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

रक्तदान शिबिरास पालकमंत्र्यांची भेट

मेहरबानो महाविद्यालय येथे कावड पालखी उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला पालकमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली.