पंडित जसराज हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील युगपुरुष

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

मुंबई, दि. १८ : पंडित जसराज भारतीय शास्त्रीय संगीतातील ‘युगपुरुष‘ होते. आपल्या दैवी स्वरांनी भारतीय शास्त्रीय संगीत आसमंतात नेतानाच त्यांनी ते जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. संगीतातील नव्या प्रवाहांचा तसेच नावीन्यपूर्ण संकल्पनांचा त्यांनी सकारात्मक दृष्टीने स्वीकार केला. जसराज यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक शिष्योत्तम घडविले. त्यांचे दैवी संगीत अमर राहील. पंडित जसराज यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीतातील एक महान पर्व संपले आहे. या दुखद प्रसंगी त्यांच्या असंख्य चाहत्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मी आपल्या शोकसंवेदना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.