अकोला, दि.5 (जिमाका) – शहरातील उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या बेघर व्यक्तींना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करुन देऊन त्यांना नास्ता, जेवण, वैद्यकीय सोईसुविधा व रोजगार निर्मिती करण्याकरीता उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी मनपाला दिले.
शहरातील निवारा केंद्राच्या भेटी दरम्यान श्री.कडू बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, मनपाचे आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण उपस्थित होते.
शहरात उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या बेघर व्यक्तींसाठी महानगरपालिकाद्वारे निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. या निवारा केंद्राला बच्चू कडू यांनी भेट देऊन निवारा केंद्रातील नागरिकांच्या सोईसुविधा व समस्या जाणून घेतल्या. शहरात विविध ठिकाणी भिक्षा मागून जगणाऱ्या व बेघर व्यक्तींना निवारा उपलब्ध करुन द्यावे. तसेच त्यांना निर्वाह भत्ता लागू करावा. त्यांच्या शारीरिक क्षमता व कौशल्यानुसार रोजगार उपलब्ध करुन द्यावा. वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करुन औषधोपचार व मुलभूत गरजा पूर्ण करण्याकरीता प्रशासनाने आवश्यक ती मदत पुरविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
आशाकिरण महिला विकास संस्थेद्वारे निवारा केंद्रातील व्यक्तींकरीता केलेल्या कामाचे कौतुक करुन निवारा केंद्रातील व्यक्तींकरीता सहली, मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमे, सण उत्सव व प्रमुख व्यक्तींचे वाढदिवस येथे साजरे करण्याचे आवाहन श्री.कडू यांनी केले. केंद्रातील व्यक्तींनी भिक्षा न मागता आत्मनिर्भर होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
000000