सिंधुदुर्ग (जि.मा.का) दि.- 28 : जिल्हा नियोजन समितीच्या 250 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास आजच्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तत्पूर्वी सन 2020-2021 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आज अखेर पर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीस पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार नारायण राणे, खा. विनायक राऊत, सर्वश्री आमदार अनिकेत तटकरे, वैभव नाईक, नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले व नियोजन समितीचे सदस्य व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या सर्वागिंण विकासाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, कोणावरही अन्याय होणार नाही. संबंधित यंत्रणांनी 31 मार्चपर्यंत जिल्हा नियोजन मधील सर्व निधी खर्च करावा. यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत. आंबोली घाटातील रस्ताच्या कडेला असलेली 197 धोकादायक झाडे काढण्यास मंजूर देण्यात आली आहे. ही झाडे काढण्याचे काम तातडीने सुरू करावे. कृषी पंपांच्या जोडणीची प्रक्रिया सुरु करावी, कालव्यांची तसेच प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्राम सडक रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावी. तसेच नियोजन समितीच्या सदस्यांनी सुचविलेल्या कामात बदल होणार नाही. सदस्य, आमदार, खासदार व निमंत्रित सदस्यांनी सुचविलेली कामे प्राधान्याने करण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, वाळू चोरी तसेच अवैद्य धंदाबाबत जिल्हाधिकारी यांनी कडक कारवाई करावी, त्याच बरोबर रस्त्यांची गुणवत्ता न जोपासणाऱ्या दोषींवर कडक कारवाईचे निर्देश ही त्यांनी या बैठकीत दिले. या बैठकीसाठी अनुपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात यावा, अशी सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी केली.
बल्क कुलरच्या पुरवठ्यासाठी असणारा 200 लीटरचा निकष बदल करून तो कोकणासाठी 100 लीटरचा करावा अशा प्रकारचा ठराव समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच सिंधुदुर्गनगरी येथे 100 मुला -मुलींच्या वसतीगृहासही मंजूरी मिळाली आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 8 हजार 698 वीज मिटरची जोडणी करण्यात आली आहे, 1175 कृषिपंप जोडण्यास मंजूरी मिळाली असून त्यापैकी 495 कृषिपंपांची जोडणी झाली असून 680 कृषिपंपांची जोडणी प्रलंबित आहे, कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या स्मारकासाठीची जागा एमटीडीसीकडे हस्तांतरीत करण्यात आली असून त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती अध्यक्षांनी सभागृहामध्ये दिली.
संबंधित यंत्रणांनी आपल्या कार्यपूर्ती अहवाल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी किमान आठ दिवस अगोदर सदस्यांकडे सादर करावा तसेच तिलारी धरणाचे कालवे फुटून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी संबंधितांनी नियोजन करावे अशी सूचना खासदार विनायक राऊत यांनी केली. तर राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवा कमकुवत असल्याचे सांगून खासदार नारायण राणे म्हणाले की, आरोग्य सेवा बळकट करण्याकडे शासनाने त्वरीत लक्ष द्यावे.
जिल्ह्यातील प्राचीन लोककला असलेली कळसुत्री बाहुल्यांचा खेळ ही कला जोपासणारे श्री परशुराम गंगावणे यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने या बैठकीत सर्वानुमते त्यांच्या विशेष अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. |
सुरुवातीस शहीद जवान व दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर जिल्हा नियोजन अधिकारी यांनी आभार व्यक्त केले.
00000