मुंबई, दि. २९ : राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्राच्या पथकाने प्रजासत्ताकदिनी राजपथावरील संचलन आणि दिल्लीतील शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करुन मानाच्या प्रधानमंत्री बॅनरचे उपविजेतेपद मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या एनसीसी पथकातील विद्यार्थी, मार्गदर्शक अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. प्रजासत्ताकदिनी सर्वोत्तम छात्रसैनिकाचा सन्मान मिळवणारी कशिष मेथवानी आणि राजपथावरील संचलनात एनसीसी पथकाचे नेतृत्व करणारी समृद्धी संत या छात्रसैनिकांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
यंदाच्या प्रजासत्ताकदिनी राजपथावरील संचलनात एनसीसी छात्र सैनिकांच्या पथकाचे नेतृत्व महाराष्ट्राच्या समृद्धी संत या विद्यार्थींनीने केले होते. यावर्षीच्या सर्वोत्तम छात्र सैनिकाचा सन्मान कशिष मेथवानी या विद्यार्थिनीला मिळाला आहे. छात्रसैनिक उपकार ठाकरे, विवेक सिंग, तनाया नलावडे यांचीही कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. कर्नल प्रशांत नायर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने मिळविलेल्या यशाबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या पथकातील सर्वांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
०००