कोल्हापूर दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : बाचणी-वडकशिवाले येथे दुधगंगा नदीवर होणाऱ्या नवीन पुलामुळे बाचणीसह या परिसरातील जनतेला दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. बाचणी व परिसरातील गावांना विकास कामांसाठी आवश्यक निधी शासनस्तरावरुन उपलब्ध केला जाईल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दुधगंगा नदीवर बाचणी-वडकशिवाले येथे बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाच्या कामाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य, मनोज फराकटे, कागल पंचायत समितच्या उपसभापती अंजना सुतार, बाचणीचे सरपंच इक्कबाल नायकवडी, उपसरपंच जे.डी. पाटील, माजी सरपंच एम.एस. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. माने, कार्यकारी अभियंता एस.डी. सोनवणे यांच्यासह बाचणी व वडकशिवाले आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, पावसाळ्यात दुधगंगा नदीला येणाऱ्या पुरामुळे या भागातील लोकांना कागलमार्गे कोल्हापूरला जावे लागत होते. यासाठी बाचणी-वडकशिवाले येथे दुधगंगा नदीवर पूल व्हावा अशी मागणी या परिसरातील जनतेची होती. या पुलाचे काम सुरु झाल्याने परिसरातील जनतेची मागणी पूर्ण होत आहे. या पुलामुळे मागील बाजूच्या गावांना पुराचा कोणताही धोका उद्भवणार नाही. यासाठी तज्ज्ञांची मते घेतली असून तज्ज्ञांच्या मागदर्शनानुसार पुलाचे काम होणार आहे, असेही ग्रामविकास मंत्री यावेळी म्हणाले.
पुलासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला असून पुलाचे काम दर्जेदार,गुणवत्तापूर्ण आणि मुदतीत पूर्ण करुन दळणवळणासाठी पूल लवकरात लकवर खुला होईल, असे कामाचे नियोजन करावे, अशा सूचना ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
कोरोना संकटामुळे राज्याच्या महसुलात घट झाली तरी शेतकऱ्यांना मदत करण्याचे राज्य शासनाने ठरवून कर्जमाफी जाहीर केली. त्याचा लाभ शेतकऱ्यांचा दिला. लवकरच 2 लाखांवरील कर्ज आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असे ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले. ग्रामविकास विभागामार्फत पाणंद रस्त्यांची कामे घेण्यात येत असून राज्यात नवनवीन योजना आणुन गावाचा विकास करण्यावर भर असल्याचे ते म्हणाले. बाचणी येथील रिंगरोड, नवीन पाणी योजना, गावातील अंतर्गत गटारे, नदी घाट या कामांचा आढावा घेऊन निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे ग्रामविकास खात्याचे कर्णधार आहेत. ग्रामविकास विभागामार्फत विकासाचे अनेक निर्णय घेतले जात आहेत. या परिसरातील विकास कामांना शासनस्तरावरुन निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.
कार्यकारी अभियंता श्री. सोनवणे यांनी पूल उभारणीबाबतची माहिती दिली. पुलाच्या बांधकाम व जोड रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाला असून पुलाचे काम दर्जेदार करण्यात येईल, असे ते म्हणाले.
एम.एस. पाटील यांनी नदी घाट, स्मशान भूमी आणि गावातील विकास कामांना निधी मिळावा, अशी मागणी यावेळी केली.
प्रारंभी सरपंच इक्कबाल नायकवडी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पिटर डिसोझा यांनी आभार मानले.
000000