नांदेड (जिमाका) दि. 28 :- कोरोना महामारीमुळे समाजाच्या सर्वच घटकांवर मोठा दुष्पपरिणाम झाला हे नाकारता येणार नाही. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. शाळेतील वर्गाद्वारे शिक्षकांचे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना जे शिक्षण व्हायचे ते थांबले होते. या कालावधीत डिजिटल शिक्षण हाच पर्याय उपलब्ध असल्याने ऑनलाईन शिक्षणाची अनुभूती कोरोना काळाची देण ठरली असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
महात्मा फुले हायस्कूलच्या अटल टिकरींग लॅबचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री तथा संस्थेचे सचिव डी.पी.सावंत तर प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद प्रतोद आ.अमर राजुरकर, आ.मोहन हंबर्डे, संस्थेचे सहसचिव अॅड. उदयराव निंबाळकर, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, कार्यकारिणी सदस्य पांडुरंग पावडे, नरेंद्र चव्हाण आदिंची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना पालकमंत्री अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर आता काळाची गरज झाली आहे. यापासून शिक्षण क्षेत्रही दूर राहू शकत नाही. व्हर्च्युअल बैठका, सभा यासोबतच आता व्हर्च्युअल क्लासेसही तयार होत आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण हीच आता खऱ्या अर्थाने कोरोनाची देण समजून इष्टापत्तीचा उपयोग शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान वाढीसाठी करावा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी असेही ते म्हणाले.
यावेळी माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. महात्मा फुलेच्या मुख्याध्यापिका सौ. माया जयस्वाल यांनी आपल्या भाषणातून महात्मा फुले हायस्कूलमधील सुरू असलेले विविध उपक्रम, ऑनलाईन शिक्षण, विद्यार्थ्यांची प्रगती व संस्थेचा सहभाग याविषयी प्रास्ताविकपर भाषणातून माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी. बी. नाईक यांनी केले तर आभार सौ. कोलेवाड यांनी मानले. या कार्यक्रमास प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.शेंदारकर, उपमुख्याध्यापक संजीवकुमार तायडे, पर्यवेक्षिका सौ.सुरेखा कदम, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे यांच्यासह शारदा भवन शिक्षण संस्थेंतर्गत शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000