अमरावती, दि. 28 : नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतींचा विकास करणे आवश्यक आहे. यासाठी नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी प्रयत्न करावा. नगरपंचायतीमधील विकासकामांसाठी पुढाकार घेऊन कामे करण्यात यावी, असे निर्देश राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले.
आज येथील विश्रामगृहात राज्यमंत्री श्री. कडू यांनी नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचा आढावा घेतला. नगरपंचायतीच्या क्षेत्रात असणाऱ्या 258 पारधी कुटुंबाच्या घरापैकी 70 घरांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच इतर घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच वस्तीसुधार योजनेतून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. पाणी पुरवठ्यासाठी जीवन प्रधिकरणाकडे पाठपुरावा करावा. तसेच चौदाव्या वित्त योजनेतून पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा. वस्तीसुधार योजनेतून रस्ते, नाल्यांचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. घरकुल पूर्ण करण्यासाठी रेतीचा प्रश्न येत आहे. यासाठी घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी अर्ज केल्यास त्याला पास देण्याची सुविधा दिली जाईल. गेल्या तीन वर्षांपासून अपंग कल्याणचा निधी वितरीत करण्यात आलेला नाही, हा निधी लवकरच वितरीत करण्यात येईल. स्मशानभूमीमध्ये विजेची सुविधा नसल्याने याठिकाणी तातडीने वीज पुरवठा करण्यात येईल, असेही श्री. कडू यांनी बैठकीत सांगितले.
00000