मुंबई, दि. २९ : मंत्रालयात काम करत असताना प्रशासकीय जबाबदारी सांभाळून मोडी लिपीचे प्रशिक्षण घेणे ही आनंदाची बाब आहे. यातून मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नवा पैलू पहायला मिळत आहे. नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी शिकण्याची स्वयंप्रेरणा असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे यांनी केले.
मंत्रालय अधिकारी संघटनेच्या वतीने आयोजित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोडी लिपी प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रमात श्रीमती लंवगारे बोलत होत्या. यावेळी माहिती व जनसंपर्क सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे, महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र धनावडे, सहसचिव सतिश जोंधळे, सरचिटणीस तथा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष विष्णु पाटील, मोडी लिपी प्रशिक्षक रामकृष्ण बुटे पाटील, मोडी लिपी तज्ज्ञ व लिप्यांतरकार भाऊराव घाडीगावकर, आदी मान्यवर आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
सचिव प्राजक्ता लवंगारे यांनी महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले. श्रीमती लवंगारे म्हणाल्या की, प्रशासकीय कामकाज करीत असताना वेळात वेळ काढून मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोडी लिपीचे प्रशिक्षण घेऊन आपल्या उत्स्फुर्तपणाचा आणि कौशल्याचा वापर केला याचा आनंद आहे. मोडी लिपीचे प्रशिक्षण प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्व संचालनालयाकडून दिले जावे यासाठी प्रयत्नशील आहोत. शासनाकडून मोडी लिपी प्रशिक्षण सातत्याने सुरु राहील याबाबत नक्कीच विचार केला जाईल, असा विश्वास श्रीमती लवंगारे यांनी यावेळी व्यक्त केला.
माहिती व जनसंपर्क सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले, मंत्रालयातील अधिकारी -कर्मचाऱ्यांना मोडी लिपी प्रशिक्षण देणे हा अतिशय चांगला उपक्रम असून असे उपक्रम या पुढेही सुरु ठेवावे. सांस्कृतिक कार्य विभागात असताना मोडी लिपीचे प्रमाणपत्र पडताळण्यास मिळाले. त्यावेळी मोडी लिपी शिकण्याची जिद्द निर्माण झाली. शिकण्याची इच्छाशक्ती असल्यास कोणतीही भाषा, लिपी आत्मसात केली जाऊ शकते. त्यामुळे आयुष्यात शिकत राहणे हे जीवनाचे लक्ष असले पाहिजे असे डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन आणि गीतगायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक विष्णु पाटील यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती सुशिला पवार यांनी केले. यावेळी प्रशिक्षणोत्तर परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
000