औरंगाबाद,दि. 29 :- (विमाका), नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करुन करण्यात आलेले घराचे बांधकाम हे पर्यावरणपूरक असल्याने पर्यावरणाची हानी होण्यास प्रतिबंध करता येतो त्यामुळे भविष्यातही या संकल्पनेकडे अधिक व्यापक दृष्टीकोनातून पाहणे काळाची गरज असल्याचे मत संचालक (माहिती) गणेश रामदासी यांनी आज येथे मांडले.
दौलताबाद परिसरातील हिरण्य रेसॉर्ट येथे ‘अरण्यार्थ फाऊंडेशन’ बंगलूरू यांनी आयोजित केलेल्या नैसर्गिक बांधकाम आणि पुनर्जन्म आर्किटेक्चरल कार्यशाळेचे उद्घाटन श्री.रामदासी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. अरण्यार्थ फाऊंडेशन बंगलूरूच्या संस्थापिका अन्विता कासार, सदस्य सप्तमी मोरे, राधिका जाधव तसेच औरंगाबाद, हैद्राबाद आणि मुंबई येथून आलेल्या आर्किटेक्ट शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्री.रामदासी म्हणाले की, खरंतर घर बांधणे हे कौशल्याचे काम आहे. त्यातही नैसर्गिक व स्थानिक साहित्यांचा वापर करुन घर बांधणे ही कला आता हळूहळू विलप्त होत आहे. आर्किटेक्ट विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन ही संकल्पना रुजवावी. या संकल्पनेतील अधिकाधिक बारकाव्यांचा अभ्यास भविष्यात विद्यार्थ्यांनी करावा. नैसर्गिक साहित्याच्या बांधकामात वाळू, दगड, माती, लाकूड, विविध खडक, कुजलेले विविध प्रकारचे दगड याचा वापर करण्यात येतो. त्यामुळे सिंमेट, सळई, वा इतर कृत्रिम साहित्याचा वापर टाळता येऊ शकतो. अशा बांधकामाचे दाखले आपल्याला पुरातन काळातून घेता येऊ शकतात.
ही कार्यशाळा 29 ते 31 जानेवारी 2021 या दरम्यान होणार असून शेवटच्या दिवशी वेरुळ येथे अभ्यास दौरादेखील आयोजित करण्यात आला असल्याचे फाऊंडेशनच्या अन्विता कासार यांनी सांगितले.
****