अमरावती, दि. 30 : नेत्रदान चळवळीत अमरावती जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. ही चळवळ राज्यात सर्वदूर पोहोचावी, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथे सांगितले.
तिवसा येथे लोकनेते स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते, त्याचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या. जि. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, तिवसा येथील नगराध्यक्ष वैभव वानखडे, जि. प. सभापती बाळासाहेब हिंगणीकर, महिला व बालकल्याण सभापती पूजा आमले, वैद्यकीय अधिकारी पावन मालूसुरे,दिलीपभाऊ काळबांडे, मुकुंदराव देशमुख, योगेश वानखडे, अंकुश देशमुख, सागर राऊत, दिवाकर भुरभुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळपासून शिबिरात तपासणीला येणाऱ्याचा ओघ सुरू झाला.असंख्य रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. नेत्र तपासणी नंतर गरजूंना नेत्र आरोग्य राखण्यासाठी संबंधित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
आदित्य ज्योत फाउंडेशन आणि स्व. भैय्यासाहेब ठाकूर समितीच्या वतीने गरजुसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मोतीबिंदू,मधुमेह आजार असलेल्या रुग्णांची तपासणी विशेष कक्षात करण्यात येत होती. नेत्र तपासणीनंतर चष्म्याचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
000