यवतमाळ, दि. 31 : 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी जिल्ह्यात आज शुभारंभ करण्यात आला. नेर तालुक्यातील उत्तर वाढोणा येथे पल्स पोलियो लसिकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उदघाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, नेर पंचायत समितीच्या अध्यक्षा मधु चव्हाण, राज्य पर्यवेक्षक डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.तरंगतुषार वारे, जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, गटविकास अधिकारी उज्वला ढोले, डॉ. रविं द्र दुर्गे, डॉ आर. खोवरे आदी उपस्थित होते .
याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, पोलिओ डोसपासून एकही बालक वंचित राहाता कामा नये. प्रत्येकाने आपल्या बालकाला पोलिओ डोस आवश्यक पाजावा, असे आवाहन केले . याप्रसंगी सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम जिल्हाभर राबविण्यात आली असुन जि.प अध्यक्षा कालींदा पवार व आरोग्य सभापती श्रीधर मोहेाड यांचे प्रमुख उपस्थितीत मादणी, ता बाभुळगाव येथेसुध्दा अधीरा राठोड या लाभार्थीला डोस पाजण्यात आला.
ग्रामीण भागात 2352 व शहरी 290 असे एकूण 2642 बुथच्या माध्यमातून, तसेच ग्रामीण 215 व शहरी 88 असे एकुण 303 ट्रांझिट टिम आणी 127 मोबाईल टिम व्दारे जिल्हातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली. पंरतु जे बालक काही कारणास्तव पोलिओ डोसपासुन वचिंत राहिले असतील त्यांच्या करीता दि २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान आय.पी.पी. आय अंतर्गत घरोघरी भेट देउन लस पाजण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
या मोहिमेकरीता जिल्हा स्तरावरून विविध विभागाचे जसे शिक्षण, बालकल्याण, आरोग्य, महावितरण व राजस्व विभागाचे सहकार्य घेण्यात आले. जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यानी जिल्हा स्तरावरून प्रत्येक कार्यालयाच्या विभाग प्रमुखाला तालुका मोहिमेच्या पर्यवेक्षणाकरीता देण्यात आले होते.
00000