मुंबई दि. २ : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसित गावातील नागरी सुविधांचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
मंत्रालयात आज पैठण तालुक्यातील पुनर्वसित गावातील नागरी सुविधांबाबतीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री वडेट्टीवार बोलत होते. यावेळी रोहयोमंत्री संदीपान भुमरे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री.वडेट्टीवार म्हणाले, जायकवाडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त गावांचे पुनर्वसन पैठण तसेच गंगापूर तालुक्यात करण्यात आलेले आहे. तसे करताना आधी करावयाच्या एकुण 13 सुविधा जिल्हा परिषदमार्फत पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित पाच सुविधा जसे की, अंतर्गत रस्ते व डांबरीकृत पोहोच रस्ते स्मशानभूमी, ग्रामपंचायत समाज मंदीर, बसथांबा व शेती पोहोच रस्ते या सुविधांपैकी काही सुविधा अद्याप संपूर्ण गावांत पुरविलेल्या नाहीत. पुनर्वसन झालेल्या सर्व गावांना डांबरीकृत मुख्य पोच रस्ते उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे तालुकास्तरावर दळणवळणाची सुविधा सदर गावांना उपलब्ध झालेली आहे. पुनवर्सन गावठाणांना जोडणारे अंतर्गत रस्ते मात्र बऱ्याच मोठ्या प्रमाणात अद्यापही बांधण्याचे राहुन गेले आहे. त्यामुळे पुनर्वसन गावठाण मधील अंतर्गत दळणवळणास खिळ बसत असून, शेती मालाची ने आण करण्यास तसेच अंतर्गत वाहतुकीस शेतकऱ्यांना व प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होत आहे.त्यामुळे तेथील पुनर्वसित गावांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सविस्तर प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने लवकर सादर करण्याचे निर्देश श्री. वडेट्टीवार यांनी दिले.
आजच्या बैठकीत पुनर्वसित गावातील प्रस्तावित रस्त्यांची कामे, पुनर्वसित गावांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, जायकवाडी प्रकल्पासाठी संपादित जमिनी बाबतच्या समस्या आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
०००