मुंबई, दि. ३ : दादर येथील सामाजिक कार्यकर्ते शमी कुरेशी यांच्या निधनाने सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या एका संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्यास आपण मुकलो आहोत, अशा शब्दात कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता तसेच अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी कुरेशी यांना श्रद्धांजली वाहिली.
अल्पसंख्याक विकासमंत्री श्री. मलिक म्हणाले, शमी कुरेशी यांनी अल्पसंख्याक समाजाबरोबरच समाजातील इतर घटकांसाठी आयुष्यभर कार्य केले. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते, नेते म्हणून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील त्यांचे कार्य नेहमीच स्मरणात राहील. उर्दू भाषेवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. समाजातील दीनदुबळ्या वर्गाला न्याय मिळावा, मदत मिळावी यासाठी ते नेहमी झटत असत. त्यांच्या जाण्याने सामाजिक जाणीव असलेल्या एका प्रगल्भ सामाजिक कार्यकर्त्यास आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मंत्री श्री. मलिक यांनी श्रद्धांजली वाहिली.