मुंबई, दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘पशुसंवर्धनाला चालना, दुग्धव्यवसायाचा नियोजनबद्ध विकास व क्रीडा विकासाचा ध्यास’या विषयावर पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रसारित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर शनिवार दि. 6 व सोमवार दि. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.25 ते 7.45 वाजता प्रसारित होईल. निवेदक भूषण करंदीकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
दुधातील भेसळ रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, दुग्धव्यवसायाचे बळकटीकरण करण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न, बालेवाडी येथे उभारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत म्हणून खेळाडूंसाठी हाती घेण्यात आलेले उपक्रम, क्रीडा विकासाचे व्हिजन आदी विषयांची माहिती श्री.केदार यांनी ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.