यवतमाळ, दि. ४ : स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतिष्ठा अतिशय चांगली असून सर्वांचे या महाविद्यालयासोबत भावनिक नाते आहे. सद्यस्थितीत या महाविद्यालयात ३०० विद्यार्थी क्षमता असलेले वसतीगृह असले तरी भविष्यात ते एक हजार क्षमतेचे करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुलींचे दोन आणि मुलांच्या एका वसतीगृहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, विधान परिषद आमदार तथा अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, आमदार इंद्रनील नाईक, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार निलय नाईक, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे आदी उपस्थित होते.
येथीन नवीन वसतीगृहाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि कंत्राटदारांनी अतिशय चांगले केले आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, सूपर स्पेशालिटीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहण्यासाठी एक हजार क्षमतेचे वसतीगृहासाठी शासनाकडून मंजुरी मिळविण्याला आपले प्राधान्य राहील. जेणेकरून विद्यार्थ्यांचा राहण्याचा प्रश्न मिटेल. नवीन वसतीगृहाला मान्यता देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल. तसेच मुलींच्या वसतीगृहाच्या संरक्षण भिंतीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देऊ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सोयीसुविधांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. कोविडमध्ये जिल्हा प्रशासनाने अतिशय चांगले काम केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार इंद्रनील नाईक, संजीवरेड्डी बोदकुरवार, नीलय नाईक यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. तत्पूर्वी मे. अवधुत कन्स्ट्रक्शन कंपनी, मे. इगल इन्फ्रा इंडिया, कार्यकारी अभियंता एम.जी.कचरे, प्रकाश पिंपळकर, विलास काण्णव यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी तर आभार डॉ. स्नेहल धुर्वे यांनी मानले. कार्यक्रमाला अभ्यागत मंडळाचे हरीष कुडे, सुरेंद्र राऊत, श्रीमती पानपट्टे, विकास क्षीरसागर यांच्यासह डॉ. गिरीश जतकर, डॉ. विवेक गुजर, डॉ. शरद मानकर, डॉ. नरेंद्र बच्चेवार, हरीहर लिंगनवार, वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विभाग प्रमुख आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००