सांगली, दि. 04, (जि. मा. का.) : राज्यातील शेतकरी सदैव स्वत:च्या पायावर उभा राहावा. शासनाची मदत घेण्याची वेळसुध्दा त्यावर येऊ नये या भावनेतून शेतकऱ्यांचे हात सदैव बळकट करण्यासाठी कृषी विभागाने काम करावे. बाजारात जे विकले जाते ते शेतकऱ्याने पिकवावे, जे विकेल ते पिकेल या संकल्पनेवर कृषी विभागाने काम करावे. राज्यातील विविध ठिकाणी करण्यात येत असलेल्या शेतीची माहिती शेतकऱ्यांना कळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषी प्रदर्शन घेण्यात येईल. असे प्रतिपादन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले.
जत येथे आयोजित माळरान कृषी व पशु प्रदर्शन, कृषी सन्मान सोहळा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी महिला व बाल विकास मंत्री ॲङ यशोमती ठाकूर, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार विक्रम सिंह सावंत, जतच्या नगराध्यक्षा शुभांगी बनेनवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, संजय विभुते, कर्नल भगतसिंह देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले, डिसेंबर 2019 मध्ये नागपूर अधिवेशनामध्ये सरकारकडून महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणी केली. कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत शेतकऱ्यांना लाभ देण्याचे काम सरकारकडून करण्यात आले आहे. कोरोनामुळे राज्याची आर्थिकस्थिती बघडली असतानासुध्दा 31 लाख शेतकऱ्यांना 20 हजार कोटींची कर्जमाफी शासनाकडुन करण्यात आली. संपुर्ण भारतामध्ये ऐवढ्या मोठ्या रक्कमेची कर्जमाफी कोणत्याही राज्यामध्ये राबविली गेली नाही. आर्थिक स्थिती सुधारताच दोन लाखांवरील व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील शेतकरी कृषी कार्यालयामध्ये आल्यानंतर त्या शेतकरी बांधवाचे स्वागत करण्यासाठी शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या अडीअडचणी जाणुन घेण्यात येणार आहेत. याची योग्य अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना कृषी विभागास देण्यात आल्या आहेत. राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करुन नवनवीन प्रयोग करुन कृषी क्षेत्रात क्रांती घडवली आहे. अशा पाच हजार शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांनी शेतीसाठी आवलंबलेले तंत्रज्ञान राज्यातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावे अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे राज्यातील सर्व शेतकरी सक्षम बनेल. असे सांगून कृषी मंत्री दादाजी भूसे म्हणाले, आता यापुढे कृषीच्या विविध योजनांना वेगवेगळे तसेच प्रत्येक वर्षी अर्ज करण्याची गरज नाही. सर्व योजनांसाठी एकच अर्जाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ग्रामस्तरावर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ग्राम कृषी समिती स्थापन करण्यात येणार आहे. अशी माहिती ही कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.
राज्यामध्ये रब्बी हंगामामध्ये खताचे लिंकींग रोखण्यासाठी 2 लाख मेट्रीक टन खताची बफर स्टॉक करण्यात आला याचा 1 कोटी 54 लाख खातेदार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. असे सांगून कृषी मंत्री दादाजी भूसे म्हणाले, यापुढील काळात गट शेतीला प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी विकेल ते पिकेल या धोरणाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी गोडाऊनची निर्मिती करणे, कोल्ड स्टोरेजची निर्मिती करणे, प्रक्रिया उद्योग उभे करणे यासाठी मोठ्या प्रमाणात काम करण्याचा निर्णय झालेला आहे.मा. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट कृषी योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 50 टक्के सबसिडी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या, जत या दुष्काळी भागातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी तेजस्विनी प्रकल्पांतर्गत दोन प्रकल्प जत तालुक्यात राबवण्यात येतील. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. याबाबतची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण करून अंगणवाडी सेविकांना सीडीपीओ पदावर पदोन्नती देण्यात येईल. तसेच अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवण्यासाठीही अभ्यास सुरू असून पुढील काळात त्यांचे मानधन ही वाढविण्यात येईल. तसेच जत तालुक्यातील महिलांचे व बालकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी उपाय योजना आखण्यात येतील. जत तालुक्याचा प्रमुख असणऱ्या पाणीप्रश्नासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य करून वर्षानुवर्षे असणारी पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू.
कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यावेळी म्हणाले, सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका म्हणून जतची ओळख आहे. ही ओळख पुसण्यासाठी जत तालुक्यातील पाणी योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात येईल. जत तालुक्याच्या पाणी प्रश्नामुळे इथले संसार शहरांमध्ये विस्थापित झालेले आहेत. कितीतरी कुटुंबे उदरनिर्वाहासाठी शहराकडे गेली आहेत. जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी इथे पाणी आणणे अत्यावश्यक आहे. पलूस, कडेगाव, खानापूर, कवठेमंकाळ, तासगाव, या तालुक्यात ज्या पद्धतीने सिंचनाच्या योजना राबवून शेतीचे क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आले, त्याच धर्तीवर जत तालुक्याला सिंचनाच्या योजना आणण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जत तालुक्यात कृषी प्रदर्शन आयोजित करून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान व्हावे यासाठी केलेला हा प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहे शेतकऱ्याला आधुनिक यंत्रसामग्रीची बी-बियाणांची खतांची ओळख व्हावी, यासाठी कृषी प्रदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे. आमदार विक्रमसिंह सावंत यांनी माळरानावरील कृषी प्रदर्शन आयोजित करून जत तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी कृषीमंत्री दादजी भुसे यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाची उद्घाटन करण्यात आले. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या पशुसंवर्धन मोबईल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.
000