मी देवगड तालुक्यातील विष्णू राजाराम डगरे. माझ्याकडे आंब्याची 400 कलमं आहेत. दरवर्षी दलालांकडे आंबा विक्रीसाठी पाठवत होतो. त्यावेळी आठशे रुपयांना एक पेटी असा दर असे. तसंच वाहतुकीमध्ये खराब होणाऱ्या आंब्याची नुकसानीही शेतकरीच सोसत होता. त्यामुळं नफा कमी मिळत होता. पण कृषी विभाग व पणन मंडळाने केलेल्या प्रयत्नांमुळं आंबा थेट ग्राहकांना विक्री केला. आंब्याला चांगला दर मिळाला. 2 हजार रुपये पेटीप्रमाणे दर मिळाला. हा सर्व व्यवहार रोखीनं होत असल्यामुळं तसंच जागेवर आंबा उचल होत असल्यामुळं शेतकऱ्यांचा चांगला फायदा होतो. दलाल रोखीचा व्यवहार करत नसत. त्यामुळं त्यांच्याकडं पैसे मिळण्यासाठी अनेक चकरा माराव्या लागत.
कोरोनाच्या संकटामुळं अनेक उद्योगांना व व्यापाऱ्यांना फटका बसला. या संकटातून शेतकरीही सुटलेला नाही. पण, हेच कोरोनाचे संकट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक बागायतदारांसाठी इष्टापत्ती ठरले. कृषि विभागानं दिलेली साथ, पणन मंडळानं घेतलेली जबाबदारी व आंबा उत्पादक यांनी मिळून या संकटातून फक्त मार्गच काढला नाही तर चांगला फायदा मिळवून देणारा एक नवा पायंडा पाडला आहे.
जिल्हा प्रशासन, जिल्हा कृषि विभाग व पणन महामंडळाने एक तोडगा काढला. शेतकऱ्यांनी त्यांचा आंबा स्वतः बाजारात नेऊन विकावा. त्यासाठी शेतकऱ्यांना व आंब्याची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना पासचे वाटप करण्यात आले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा यासारख्या शहरांमध्ये आंबा विक्रीसाठी परवानगी मिळाली. तसंच पणन मंडळानं आंब्याची ऑनलाईन विक्रीही सुरू केली. त्यासाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली. या सर्व प्रयत्नांना यश येऊन आंब्याच्या विक्रीला सुरुवात झाली.
या सर्व प्रयत्नांचा फायदा शेतकरी व ग्राहक या दोन्ही घटकांना झाल्याचं दिसून आलं व आंब्याच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली. आंब्याच्या पेटीला सुमारे 1 हजार आठशे ते 2 हजार रुपये भाव मिळत आहे.
यंदाच्या वर्षी ही आंबा विक्रीची पद्धत कायम राहावी असे मत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील अनेक बागायतदारांचे आहे.