मुंबई, दि. 6 :- “ज्येष्ठ कामगार नेते श्री. र. ग. कर्णिक यांच्या निधनाने राज्य कर्मचाऱ्यांचा बुलंद आवाज, राज्याच्या कामगार चळवळीचे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्काची लढाई लढताना, जनतेप्रती असलेल्या जबाबदारीचेही त्यांना भान होते. राज्य कर्मचाऱ्यांचे अलोट प्रेम, अतूट विश्वास लाभलेले ते कामगार नेते होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
श्री. र. ग. कर्णिक यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस म्हणून कर्णिक साहेबांनी प्रदीर्घ 52 वर्षे काम केले. कामगारांच्या हक्कांसाठी अनेक लढे लढले. संघर्ष करायचा, परंतु तुटेपर्यंत ताणायचं नाही, याचा विसर त्यांना कधी पडला नाही. राज्य शासन आणि कर्मचारी संघटनांमध्ये नेहमीच समन्वय, सहकार्याचे वातावरण राहीले, याचे श्रेय कर्णिक साहेबांच्या नेतृत्वालाही जाते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
००००००