खासदार राहुल शेवाळे, नगरसेवक वसंत नकाशे, नगरसेविका हर्षला मोरे यांसह ३० जणांचा सत्कार
मुंबई, दि. 23 : कोरोनाचे संकट अद्याप गेले नाही, परंतु तरीही अनेक लोकांनी मास्क लावणे सोडून दिले आहे, हे बेजबाबदार सामाजिक वर्तन चिंतेचा विषय आहे. कोरोनाबाबत सतर्कता, जागरुकता व नियमांचे सर्वांनी पालन करणे हीच खरी समाजसेवा ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
साप्ताहिक धगधगती मुंबईच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त धारावीला कोरोनामुक्त करणाऱ्या 30 कोरोना योद्ध्यांचा राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते खासदार राहुल शेवाळे, नगरसेवक वसंत नकाशे, नगरसेविका हर्षला आशिष मोरे, मुंबई महानगरपालिका सहायक आयुक्त किरण दिघावकर, सहायक पोलीस आयुक्त रमेश नागरे, आरोग्य अधिकारी डॉ.विरेंद्र मोहिते, इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ.अनिल पाचणेकर, लावणी कलावंत महासंघाचे अध्यक्ष संतोष लिंबोरे व धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप यांसह 30 कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, भारतातील सर्व जाती, पंथ, धर्माचे लोक आपले देशबांधव आहेत व संकटसमयी त्याच्या मदतीला धावून जाणे हे आपले कर्तव्यच आहे, ही भावना येथील लोकांमध्ये आहे. सेवा हाच खरा धर्म आहे. हे या देशातील संस्कार आहेत. त्यामुळेच कोरोना काळात लोक प्रतिनिधी, पोलीस, पत्रकार, डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छताकर्मी यांसह सामान्यातील सामान्य माणसाने सेवा रूपाने समाजाला आपले योगदान दिले, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.
सन 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले त्यावेळी आपण विद्यार्थी होतो. त्या कठीण काळात आपल्या गावातील गरीबातील गरीब महिलेने आपले सोन्याचे दागिने देशासाठी दिले होते, अशी आठवण राज्यपालांनी यावेळी सांगितली. देशाप्रती व समाजाप्रती सेवा व समर्पण भावनेमुळेच समाज जीवंत राहतो, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.
धारावीत कोरोनाचा फैलाव झाल्यास त्याचा राज्याला व देशाला धोका आहे, हे जाणून धारावीतील लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा, खाजगी डॉक्टर्स व जनसामान्यांनी कृती आराखडा तयार करून कोरोनावर मात केली. त्यानंतर सर्वात मोठे प्लाझ्मादान शिबीर देखील तेथे भरवले. धारावीतील यशाचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले असे सांगून धारावीतील यश हे सर्व धारावीकरांचे यश आहे, असे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ता संदीप कदम, सहायक परिचारिका श्रीमती मंजू वीर, मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी गंगा दरबेर, सामाजिक कार्यकर्ता राकेश गुप्ता, अन्न व धान्यपुरवठा विभागातील अंकित अनिल गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते परवेज शेख, उदय नांदे, सुनील कांबळे, महादेव नारायणे व प्रविण जैन, ग्लोकल कम्युनिकेशनचे संचालक भास्कर तरे, विश्वस्त, निऑन हॉस्पीटल मिलिंद शिंदे, मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी सुरेश पालवे, समाजसेवक दिलीप कटके, समाजसेवक, शांताराम कारंडे, सामाजिक कार्यकर्ता सुरेश रांजवण, विनायक पोळ, डॉ रुपेश सोनवणे यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते धगधगती मुंबईच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. संपादक भीमराव धुळप यांनी आभार मानले तर संतोष लिंबोरे यांनी सूत्रसंचलन केले.
**
Governor felicitates Corona Warriors from Dharavi
The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari felicitated 30 Corona Warriors from Dharavi at Raj Bhavan, Mumbai on Tuesday (23 Feb). The felicitation was organized by Marathi weekly newspaper ‘Dhagdhagti Mumbai’.
Member of Parliament Rahul Shewale, Corporators Vasant Nakashe and Harshala Ashish More, BMC Assistant Municipal Commissioner Kiran Dighavkar, Asstt Commissioner of Police Ramesh Nagre, Health Officer Dr Virendra Mohite, Vice President of Indian Medical Association Dr Anil Pachnekar, Santosh Limbore and Editor of Dhagdhagti Mumbai Bhimrao Dhulap were among those felicitated on the occasion.
००००