मुंबई, दि. 23 : ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई आणि मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ फेब्रुवारी, २०२१ रोजी दुपारी २.३० ते ५.०० यावेळेत “मराठी भाषेला अभिजात दर्जा” व “आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी साहित्य प्रसार आणि प्रचार” या विषयांवर परिसंवादांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे (वेबिनार) आयोजन विधानपरिषदेचे सभापती श्री. रामराजे नाईक-निंबाळकर, उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या परिसंवादांचे उद्घाटन सत्र मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार, महसूल मंत्री श्री.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने आणि मराठी भाषामंत्री श्री.सुभाष देसाई, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, विरोधी पक्षनेते श्री.देवेंद्र फडणवीस आणि श्री.प्रविण दरेकर, संसदीय कार्य राज्यमंत्री श्री. सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि श्री. संजय बनसोडे, मराठी भाषा राज्यमंत्री श्री. विश्वजीत कदम, विधिमंडळ मराठी भाषा समितीचे प्रमुख श्री.चेतन तुपे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
परिसंवादातील “मराठी भाषेला अभिजात दर्जा” या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक श्री.सदानंद मोरे, डॉ. विजयाताई वाड, प्रा. हरी नरके, माजी विधानपरिषद सदस्य श्री. हेमंत टकले, प्रा. मिलिंद जोशी आपले विचार व्यक्त करतील. “आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार” या विषयावरील परिसंवादात विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे, माजी सनदी अधिकारी श्री. लक्ष्मीकांत देशमुख, श्री. मंदार जोगळेकर, श्री. प्रसाद मिरासदार, श्री.आनंद अवधानी, पत्रकार रश्मी पुराणिक वक्ते म्हणून सहभागी होतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती उत्तरा मोने करणार आहेत.
या दूरदृश्य प्रणाली परिसंवादात दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, मराठी भाषाप्रेमी मान्यवर, पत्रकार, महाविद्यालयीन प्राध्यापक-विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव श्री.राजेन्द्र भागवत आणि वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्री.निलेश मदाने यांनी दिली.
या परिसंवादात श्रोते म्हणून सहभागी होण्यासाठी विधानमंडळ पद्धती विश्लेषक (संगणक कक्ष) श्री.अजय सर्वणकर भ्रमणध्वनी क्रमांक ८६९१८७७७६७ आणि वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे विशेष कार्य अधिकारी श्री. राजेंद्र संखे भ्रमणध्वनी क्रमांक ९९२०४८३७७७ यांच्याशी संपर्क साधून लिंक प्राप्त करून घ्यावी.
००००