औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : शहरातील एन सहा भागात साकारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानातील सद्यस्थितीत असलेल्या प्रत्येक वृक्षाचे संवर्धन, जतन करण्यासाठी प्रशासनाने सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात. शिवाय अस्तित्त्वात असलेल्या वृक्षांमध्ये नवीन रोपांची लागवड करून हा परिसर अधिक निसर्गसंपन्न करत या जागेचे वैशिष्टये जपण्याच्या सूचना उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी प्रशासनाला केल्या.
शहरात एन सहा भागात मनपाच्यावतीने बाळासाहेब ठाकरे स्मृतीउद्यान साकारण्यात येत आहे. या उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी श्री. देसाई यांनी केली. यावेळी आमदार अंबादास दानवे, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, प्र. जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे आदींसह महसूल आणि मनपा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.
पाहणी दरम्यान पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले, मनपाच्यावतीने बाळासाहेब ठाकरे स्मृतीउद्यान साकारण्यात येत आहे. नुकतेच भूमिपूजन होऊन या उद्यानाच्या कामाला सुरूवात झाली आहे. या उद्यानाची जागा नागरिकांच्या सोयीची व निसर्गसंपन्न अशी आहे. या जागेतील प्रत्येक वृक्षाचे संवर्धन, जतन व्हावे यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निसर्गप्रेमी आहेत, त्यांनी या जागेतील वृक्षांची तोड करण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. मनपाच्यावतीने मोठ्याप्रमाणात या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येत आहे. मागील काही दिवसांत वादळामुळे काही झाडे उन्मळून पडली आहेत. मात्र, या उद्यानात अधिकाधिक देशी वृक्ष लागवडीला प्राधान्य देण्यात येत आहे, याबाबत समाधान आहे. तसेच अस्तित्त्वात असलेल्या वृक्षांची सविस्तर क्रमांकनिहाय यादी, नोंद करण्यात यावी, अशा सूचना करत याबाबत अहवाल सादर करण्याचेही श्री. देसाई यांनी निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी मनपा आयुक्त श्री. पांडेय, अ.आयुक्त बी. बी. नेमाने, शहर अभियंता सखाराम पानझडे, सिद्धार्थ उद्यानाचे विजय पाटील, श्री. वाघमारे, पियूश जैन आदींनीही श्री. देसाई यांना स्मृतीउद्यानात उभारण्यात येणाऱ्या साधनसुविधा, निसर्गाची काळजी, पार्किंग व्यवस्था आदीं बाबत सविस्तर माहिती दिली.
पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण
बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानातील उन्मळून पडलेल्या, नव्याने लागवड करण्यात आलेल्या वृक्षाची अत्यंत बारकाईने पाहणी पालकमंत्री श्री. देसाई यांनी केली. तसेच त्यांच्याहस्ते यावेळी याठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले. या पाहणी दरम्यान शहरातील निसर्गप्रेमी, पर्यावरण तज्ज्ञ आदींची उपस्थिती होती.