नवी दिल्ली ,दि. २७ : भाषेचे सौष्ठव वृध्दींगत होण्यासाठी व टिकविण्यासाठी बदलानुसार नव्याचा स्वीकार आणि जुने ते जतन करण्याची वृत्ती मराठीसह सर्व भाषांनी अवलंबावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सकाळ नवी दिल्लीच्या वृत्त विभागाचे प्रमुख अनंत बागाईतकर यांनी केले.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक तथा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची जयंती अर्थात मराठी भाषा गौरव दिना निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने ‘मराठी भाषा काल, आज आणि उद्या’ या विषयावर आयोजित ऑनलाईन व्याख्यानात श्री. बागाईतकर यांनी हे मत व्यक्त केले. तत्पूर्वी महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. दैनिक सकाळ नवी दिल्लीचे प्रतिनिधी मंगेश वैशंपायन यावेळी उपस्थित होते.
श्री. बागाईतकर म्हणाले, मराठी व अन्य कोणत्याही भाषांचा उत्पत्तीपासूनचा प्रवास हा नैसर्गिक आहे. भाषा-भाषांमधील संकर हा भाषांच्या उत्क्रांतीसाठी पुरकच ठरला. विकसनाच्या या सर्व प्रवासात भाषांनी चांगल्या गोष्टी व प्रवाह स्वीकारले व परिणामी भाषा समृध्द होत गेल्या. म्हणूनच भाषांचे सौष्ठव वृध्दींगत होण्यासाठी व टिकण्यासाठी नवीन बदल खुल्या व निकोप मनाने स्वीकारले पाहिजे त्यामुळे प्रमाण भाषेचा दुराग्रह करण्याची वेळही येणार नाही असे ते म्हणाले.
भाषा सौष्ठवासाठी त्या-त्या भाषेतील म्हणी, वाक्प्रचारांचे जतन होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. एखादा संदेश ,गोष्ट किंवा विचार कमी शब्दात मांडण्याचे प्रभावी साधन म्हणजे ‘म्हणी आणि वाक्यप्रचार’ होत. ‘म्हणी आणि वाक्यप्रचार’ हे भाषेचा संस्कृतीशी असलेल्या संबंधाचे प्रतिनिधीत्व करीत असतात. लोक व्यवहार व लोक वाड:मयातून निर्माण झालेल्या व आपल्या पूर्वसुरींनी शोधून काढलेल्या अशा सकस म्हणी व वाक्यप्रचारांचा वापर आज कमी झाल्याचे दिसते .ही काही अंशी चिंतेची बाब असली तरी आजच्या बदलत्या युगात उपयोगात येत असलेल्या नव-नवीन माध्यमांतूनही म्हणी व वाक्यप्रचारांचा उपयोग करून आपण या भाषिक अलंकारांचे जतन करू शकतो व ते प्रत्येकाने करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मराठी भाषेचा उगमापासून टप्प्याटप्प्याने झालेला विकास व कालानुरूप भाषेत झालेले बदल श्री. बागाईतकर यांनी विविध उदाहरण आणि रचनांचे दाखले देवून मांडले. परदेशी व देशातील अन्यभाषिक व्यवहारातील बदलांचा संक्षिप्त आढावा घेत त्यांनी कालची मराठी भाषा आणि आजच्या मराठी भाषेतील बलस्थानांवर प्रकाश टाकला. भविष्यातील मराठी भाषेच्या विकासासाठी नवे बदल स्वीकारण्याचे व जुने ते जतन करण्याचे विचार मांडले.