सातारा दि.18 (जिमाका): सातारा येथील सैनिक स्कूल कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून उभे राहिले आहे. या सैनिक स्कूलच्या विकास कामांसाठी राज्य शासनाने 300 कोटींची तरतूद केली आहे. या सैनिक स्कूलचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज सैनिक स्कूलच्या पाहणीदरम्यान सांगितले.
या पाहणीप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, सातारा जिल्हा अधीक्षक अभियंता संजयकुमार मुनगीलवार प्रांताधिकारी मिनाज मुल्ला,तहसीलदार आशा होळकर, कार्यकारी अभियंता एस.पी. दराडे ,सातारा सैनिक स्कूलचे प्राचार्य उज्वल घोरमाडे, उपप्राचार्य बी. लक्ष्मीकांत, प्रशासकीय अधिकारी प्रमोद पाटील, सातारा सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी अमर जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, सैनिक स्कूलची स्थापना 1961 साली झाली आहे. या शाळेचा परिसर 115 एकर असून या शाळेत 630 विद्यार्थी शिकत आहे. या सैनिक स्कूलमधील काही इमारती 1932 व 1962 या वर्षातील आहे. त्या आता जुन्या झाल्या आहेत. राज्य शासनाने सैनिक स्कूलच्या विकासासाठी 300 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. या सैनिक स्कूलच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने विकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे. त्या कामाला आता गती द्यावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.
यावेळी पालकमंत्री यांनी एनडीए ब्लॉक, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, डहाणूकर हॉल, कॅन्टीन , शाळेची मुख्य इमारतीबारोबर सैनिक स्कूलच्या मैदानाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.