नवी दिल्ली, दि. १८ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव ऑनलाईन व्याख्यानमालेत’ २० मार्च २०२१ रोजी माजी कुलगुरु तथा माजी उच्च शिक्षण संचालक डॉ. एस.एन.पठाण हे व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि या काळात राज्याने विविध क्षेत्रात घेतलेली उत्तुंग भरारी तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष हा सुवर्णयोग साधत परिचय केंद्राने या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. एस.एन.पठाण हे ‘उच्च शिक्षण काल आज आणि उद्या’ या विषयावर २० मार्च २०२१ रोजी दुपारी १२ वाजता आपले विचार मांडणार आहेत.
महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा
देशाच्या आर्थिक विकासाचे इंजिन बनलेल्या महाराष्ट्राने इतर राज्यांना प्रेरणा ठरेल असे कार्य केले आहे. वंचित उपेक्षित घटकांबरोबर महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याने अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत ६० वर्षांच्या कालावधीत सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीचा व उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे’ आयोजन करण्यात आले आहे. कवी, लेखक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांच्या व्याख्यानाने व्याख्यान मालेची सुरुवात होत आहे. या व्याख्यानमालेत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होऊन महाराष्ट्र राज्याने केलेल्या प्रगतीबाबत आपले विचार मांडणार आहेत.
महाराष्ट्र परिचय केंद्राचाही हीरक महोत्सव
देशाची राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक दूतावास म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्र परिचय केंद्राची १९६१ मध्ये स्थापना झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेले हे कार्यालय केंद्र व राज्य शासनातील दुवा म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे.या कार्यालयाने गेल्या ६० वर्षात यशस्वी वाटचाल केली आहे. राज्याचे व परिचय केंद्राचे स्थापना वर्षे असे औचित्य साधून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. एस. एन. पठाण यांच्याविषयी…
डॉ. शहाबुद्दीन नुरमहंमद तथा एस.एन. पठाण यांनी १९७७ मध्ये वनस्पती शास्त्राचे अधिव्याख्याता म्हणून नोकरीस सुरुवात केली. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून त्यांनी वनस्पतीशास्त्रात पीएचडी मिळविली. जर्मनी आणि जपान येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्र परिषदेत त्यांनी शोध निबंध सादर केले. १९९९ ते २००५ दरम्यान राज्याचे उच्च शिक्षण संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. २००५ ते २०१० या कालावधीत त्यांनी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु पद भूषविले. त्यांच्याच काळात या विद्यापीठाचे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ असे नवीन नाव देण्यात आले.
‘टाकीचे घाव’ या मूळ मराठी भाषेतील त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या असून उर्दू, हिंदी, अरेबिक आणि इंग्रजी भाषेतही या पुस्तकाच्या आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. दै. पुण्यनगरीतून समाजसंवाद या सदरातून त्यांचे ५२ वैचारिक लेख प्रसिध्द झाले. याच लेखांचे ‘समाजसंवाद’ हे संपादित पुस्तक प्रकाशित झाले.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या शिक्षक निवड समितीवर राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली असून सध्या ते काश्मीर विद्यापीठाच्या शिक्षक निवड समितीवर राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. डॉ. पठाण हे वर्ष २०१० पासून माईर्स एमआयटीच्या आळंदीस्थित विश्वशांती केंद्राचे धोरणात्मक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
शनिवारी समाजमाध्यमांतून व्याख्यानाचे प्रसारण
शनिवारी 20 मार्च 2021 रोजी दुपारी 12 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटर हँडल , फेसबुक युट्यूब चॅनेलवरुन व्याख्यान थेट प्रसारित होईल. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटरहँडल https://twitter.com/MahaGovtMic,
हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindiआणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share वर पाहता येणार आहे.
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४८/दिनांक १८.०३.२०२१