मी श्रीराम तुळशीराम तायडे जांभरून, ता. बुलडाणा येथील रहिवासी माझ्याकडे दीड एकर शेती आहे. या शेतातील पिकासाठी मी सन २०१८ – २०१९ मध्ये ३२,१२७ रूपये पीक कर्ज बँक ऑफ महाराष्ट्रकडून घेतले होते. मात्र अतिपावसामुळे पिकाचे नुकसान झाले. उत्पादन न मिळाल्यामुळे पीक कर्ज भरू शकलो नाही. त्यामुळे कर्ज थकीत झाले. पुढील वर्षी पीक कर्ज मिळणार की नाही, पिकासाठी पैसे कुठून आणावे, या विवंचनेत मी होतो. परंतु राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमुळे ही विवंचना दूर झाली. या योजनेतुन माझे ३२,१२७ रूपये पीक कर्ज माफ झाले. त्यामुळे माझ्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरला.
शेतीचे क्षेत्र कमी असून मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे माझे खूप नुकसान झाले. उत्पादन न मिळाल्यामुळे अडचाणींमध्ये अजूनच भर पडली. शेतीच्या कामांसाठी तसेच इतर खर्चांसाठी पैश्यांची खूप गरज होती. महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजनेतून कर्जमाफी मिळाली. थकीत कर्ज फिटल्यामुळे मला महाराष्ट्र बँकेच्या शाखेने १६ हजार रुपये पीक कर्ज दिले. शासनाच्या या योजनेमुळे माझे पीक कर्ज माफ झाल्यामुळे खऱ्या अर्थाने मला उभारी मिळाली आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज उतरविले आहे. त्यामुळे राज्य शासनाचे आभार.
श्रीराम तुळशीराम तायडे, रा. जांभरून ता. जि. बुलडाणा