मी परविन बानो, अमरावतीत यास्मिन नगर भागात आमचा अल्पसंख्यांक महिलांचा बचत गट कार्यरत आहे. महिलांना संधी मिळणे गरजेचे असते. कुठलातरी व्यवसाय सुरू करावा, मुलाबाळांच्या भविष्यासाठी चार पैसे मागे टाकावे असा विचार आम्ही नेहमीच करीत असू. पण ही सर्व सुरुवात करावी तरी कशी? असा प्रश्न सतत भेडसावत असे. मग एके दिवशी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून माहिती मिळाली दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत आम्ही अश्मीरा बचत गट सुरू केला. आमच्या गटाला वर्ष 2019-20 मध्ये दहा हजार रुपये फिरता निधी मिळाला. आमच्या गटाला बँकेचे एक लक्ष वीस हजार रुपये कर्ज मिळाले. या मिळालेल्या कर्जातून आम्ही फायबर टेबल, खुर्ची व इतर दैनंदिन गरजेची फायबरची सामग्री घेतली आणि या वस्तुंच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. गटात आम्ही दहा महिला आहोत.
गटाच्या सचिव नुसरत परविन आहेत तर सहयोगिनी हिना मॅडम आहेत. पंचसूत्रीचे पालन करणारा आमचा गट आहे. गटाची मासिक बचत एक हजार रुपये महिना आहे. आज आम्ही आत्मविश्वासाने व्यवसाय करीत आहोत. बचतगटामुळे आमच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळाले. बचतीची सवय रुजल्याने व्यवसायाच्या क्षेत्रात आम्ही आत्मविश्वासाने उतरु शकलो. यासाठी वेळोवेळी ‘माविम’ चे सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्यामुळे व्यवसायातील नवनवीन आव्हाने आम्ही यशस्वीरित्या पेलण्यास सक्षम होत आहोत.