अमरावती, दि. 24 : आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल उशिरा प्राप्त होत असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून येत आहेत. हे अहवाल वेळेत मिळण्यासाठी कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे, व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवताच ‘प्रिव्हेंटिव्ह’ औषधोपचार वेळीच सुरु करावे. तशी सूचना ग्रामीण परिसरातील डॉक्टर, प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
कोरोना प्रतिबंधक उपायांबाबत जिल्हा परिषद यंत्रणेची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जि. प. अध्यक्ष बबलुभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, डॉ.रेवती साबळे आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचे व्यवस्थापन जिल्हा यंत्रणेकडून होत आहे. गरजेनुसार ही सर्व सामग्री उपलब्ध करुन घेण्याबाबत सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. या काळात ग्रामीण आरोग्य यंत्रणेने लक्षणे जाणवणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वेळीच ‘प्रिव्हेंटिव्ह’ उपचार सुरु करावेत जेणेकरून आजारावर वेळीच नियंत्रण मिळवणे शक्य होईल. तशी औषधे प्राथमिक आरोग्य केंद्र व कोविड केअर केंद्र येथे उपलब्ध आहेत. तशा सूचना सर्व केंद्रांना द्याव्यात. याबाबत केंद्रांसाठी एक परिपत्रक जारी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
संचारबंदीपालनासाठी ग्रामपंचायतला पोलिसांनी सहकार्य करावे
ग्रामीण भागात संचारबंदीचे उचित पालन व्हावे. त्यासाठी ग्रामपंचायत यंत्रणेला ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण सहकार्य करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स या बाबी पाळल्याच गेल्या पाहिजेत. साथ रोखण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात रुग्णवाहिका सेवेबाबत तक्रारी येत आहेत. मात्र, आवश्यक तिथे वाहने पुरविण्यासाठी भाडेतत्वावर वाहने उपलब्ध करून घेण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्री.नवाल यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील डॉक्टर बांधवांनी प्रत्येक ताप म्हणजे कोरोना समजावा व सर्वप्रथम त्याला आयसोलेशनचा सल्ला द्यावा व त्यानंतर त्याची आरटीपीसीआर चाचणीही करून घ्यावी. ग्रामीण भागातील जनरल प्रॅक्टिशनरला रुग्णावरील उपचारात ॲजिथ्रोमायसीन, आयवरमॅक्टिन, माँटेल्युकास्ट अशी औषधे वापरता येतील, असे तज्ज्ञांनी सुचविले आहे. त्यानुसार कार्यवाही व्हावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात स्टीम सप्ताहाची सुरुवात सोमवारपासून होत आहे. त्यात सर्वांनी सहभागी होण्यासाठी गावोगाव जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा अविरत कार्यरत आहे. गावातील सर्व नागरिक आणि ग्रामविकासातील सर्व सहकारी सैनिक होऊन काम करत आहेत.आपल्या सर्वांच्या प्रयत्नांतून सहकार्यातून आपण कोरोनाच्या संकटावर मात करू, असा विश्वास व्यक्त करत पालकमंत्र्यांनी सर्वांना राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
000