मुंबई, दि. 28 : वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी लढणारा हक्काचा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला. अशा शब्दांत सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली.
माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड मूळचे सातारा जिल्ह्याचे होते. व्यवसायानिमित्त ते मुंबईत आले. धारावी सारख्या भागात त्यांनी मोठे सामाजिक कार्य केले. कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे नेते होते. आमदार, खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी जनतेने मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर सोपविली होती. ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.
सहकारमंत्री श्री. पाटील म्हणाले, युवक काँग्रेसपासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. आमदार त्यानंतर राज्यमंत्री म्हणून आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार, गृहनिर्माण विभागाचे कामकाज पाहिले, खासदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशी त्यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली.
000