अमरावती, दि. १० : घरी सहा महिन्यांची चिमुकली; पण कोरोना साथीमुळे तिची महिनोनमहिने भेट नाही. कुटुंबियांशी संवाद होतो व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून. मात्र, साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी रुग्णसेवेत खंड पडू दिला नाही. मोगर्दाच्या उपकेंद्रातील आरोग्यसेवक राजेंद्र चकुले यांची ही निरंतर सेवा पाहून धारणीच्या प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनाही गहिवरून आले.
श्री. चकुले हे मुलीच्या जन्मानंतर एकदाच घरी जाऊ शकले व त्यांना तिला पाहता आले. त्यानंतर पुढील सहा महिने त्यांचा कुटुंबियांशी केवळ व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद झाला. प्रकल्प अधिकारी श्रीमती सेठी यांनी नुकतीच कोविड केअर सेंटरला भेट दिली असता त्यांना ही माहिती मिळाली.
गत आठवड्यात कोविड केअर सेंटरला श्रीमती सेठी पोहोचल्या असता तेथील एका रूग्णाचा श्री. चकुले यांच्याशी वाद झाल्याचे त्यांना आढळले. आपल्याला घरी जायला परवानगी मिळावी, असे रूग्णाचे म्हणणे होते आणि अजूनही रुग्णाला काही दिवस सेंटरमध्ये थांबण्याची आवश्यकता असल्याचा श्री. चकुले यांचा आग्रह होता. त्यावेळी श्री. चकुले हे प्रकल्प अधिका-यांना म्हणाले की, “मॅडम, पेशंटला केअर सेंटर थांबण्याची गरज होती. कारण, त्याची जोखीम पुरेशी कमी झालेली नव्हती. या रुग्णाला घरी सोडण्याबाबत इतरांचेही फोन आले. मात्र, मी सगळ्यांना साफ नकार दिला आणि स्पष्ट सांगितले की, कोणाचाही फोन येवो, रुग्णाची उपचार कालावधी संपल्याशिवाय व प्रकृतीत सुधारणा झाल्याशिवाय मी त्याला सोडणार नाही. ती माझी जबाबदारी आहे.” आरोग्यसेवकाची ही कर्तव्यनिष्ठा पाहून प्रकल्प अधिका-यांनी कौतुक केले व श्री. चकुले हे निरंतर सेवा बजावत असल्याचीही माहिती त्यांना मिळाली. आपण जोखमीच्या ठिकाणी काम करतो. आपल्या कुटुंबाला व चिमुकलीला आपल्यापासून संसर्ग होऊ नये म्हणून घरी जात नसल्याचे सांगताना श्री. चकुले यांचे डोळे पाणावलेले होते. प्रकल्प अधिका-यांनी या घटनेचा आपल्या फेसबुकवरील लेखनात विशेष उल्लेख केला.
धारणी येथे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विकास गवई समुदाय आरोग्य अधिकारी हेही अविरत सेवा देत आहेत. त्यांचाही कौतुकास्पद उल्लेख प्रकल्प अधिका-यांनी केला. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन खंबीरपणे अविरत रूग्णसेवा देत आहे. त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच कोरोनावर मात करता येईल, असे श्रीमती सेठी यांनी सांगितले.
000