सोलापूर, दि.14 : जिल्ह्याला कोविड लस, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा इतर जिल्ह्यांपेक्षा सुरळित होत असून लसीव्यतिरिक्त कोणताही तुटवडा नाही. कोविड-19 चे लसीकरण कसे चालते, समस्या काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापुरातील शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या लसीकरण केंद्राला भेट दिली.
यावेळी महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर, नगरसेवक आनंद चंदनशिवे, उपायुक्त धनराज पांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद कुंभोजकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन राजू राठी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. अनूप दोशी, पुरूषोत्तम धूत, हर्षल कोठारी आदींसह जैन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या लसीकरण केंद्राला श्री. भरणे यांनी भेट देऊन समाधान व्यक्त करून जैन संघटना, प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. नोंदणी व्यवस्था, डाटा एन्ट्री आणि लसीकरण कक्षाची पाहणी श्री. भरणे यांनी केली. याठिकाणचे नियोजन पाहून पालकमंत्री श्री. भरणे भारावून गेले. अत्यंत मॉडेल असे लसीकरण केंद्र आहे. गर्दी टाळण्यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांना बसण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, मंडप टाकल्याने ऊन, वारा, पाऊस यापासूनही संरक्षण होत आहे. ज्यांचे लसीकरण आहे, त्यांना फोनद्वारे बोलावले जाते, नोंदणी करून कूपन देऊन लसीकरण केले जात आहे.