मुंबई, दि. 16 : काँग्रेस पक्षाचे युवा नेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अंतःकरण पिळवटून टाकणारे आहे. तरुण वयातच देशपातळीवर नावलौकिक कमावलेला, लोकशाहीवर, काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता आम्ही गमावला आहे, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
खासदार राजीव सातव यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करून श्री.थोरात म्हणाले की, खासदार राजीव सातव यांचे काम मी जवळून पाहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पंचायत समिती सदस्य ते खासदार प्रत्येक जबाबदारी पार पाडत असताना गरीब, कष्टकरी जनता, तरूण व शेतकऱ्यांचे प्रश्न ते अत्यंत तळमळीने मांडत असत. आपल्या कामाच्या ताकदीवर ते कमी वयात देश पातळीवरच्या राजकारणात पोहोचले. आमदार, खासदार म्हणून त्यांनी आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण केली होती. सामाजिक, राजकीय प्रश्नांची त्यांना उत्तम जाण होती. विविध विषयांचा अभ्यास, संघटन कौशल्य, अभ्यासू, मनमिळावू, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष व त्यानंतर अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी तरुणांचे मोठे संघटन उभे केले. खासदार म्हणून संसदेत काँग्रेस पक्षाची भूमिका ते भक्कमपणे मांडत असत. कृषी कायद्याला तीव्र विरोध करत राज्यसभेत त्यांनी पक्षाची बाजू समर्थपणे मांडली. त्यांना तीनवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. संविधान, लोकशाही व काँग्रेस विचारांसाठी संघर्ष करण्याची त्यांची तयारी असायची. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर काँग्रेस पक्षाची सर्वोच्च समिती असणाऱ्या काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली होती. राजीव सातव यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाची व काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. आम्ही सर्व या कठीण प्रसंगी सातव कुटुंबियांच्या सोबत आहोत. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करतो.
खासदार राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून, राजीव तुमची मेहनत, संघर्ष कायम आठवणीत राहील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
000