रायगड, दि.16 (जिमाका) : अरबी समुद्रात “तोक्ते” चक्रीवादळ निर्माण झाले असून ते समुद्रमार्गे गुजरातकडे रवाना होणार आहे. मात्र या चक्रीवादळामुळे रायगड जिल्हा देखील प्रभावित होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन या नैसर्गिक आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी सज्ज असून रायगडकरांनीही जिल्हा प्रशासनाला साथ देवून सतर्क व सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात देखील त्याचा प्रभाव दिसणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची व वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडून सर्व शक्तीनिशी तयारी करण्यात आली आहे. कोरोनाचा काळ सुरु असून जिल्ह्यात सद्य:स्थितीत 10 हजारांपेक्षा जास्त ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 59 खाजगी रुग्णालये तसेच शासकीय रुग्णालय येथे अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्या दृष्टिकोनातून संबंधित आरोग्य, महावितरण, सार्वजनिक बांधकाम आदी सर्व विभागांना सजग राहण्यासाठी सूचित करण्यात आले आहे.
या चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असले तरी देखील नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. तेव्हा नागरिकांनी घरातच सुरक्षित रहा, कच्च्या स्वरूपाचे घर, स्लॅबला तडा गेलेला असेल तर अशा ठिकाणी नागरिकांनी थांबू नका. त्यांनी तात्काळ नजिकच्या सुरक्षित स्थळी थांबणे गरजेचे आहे. समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. कच्ची घरे दरडग्रस्त भागातील घरे, आदिवासी भागातील कच्ची घरे येथील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. गृह विलगीकरण असलेले रुग्ण जर कच्च्या घरात राहत असतील तर त्यांना स्थानिक प्रशासनाच्या मदतीने नजिकच्या रुग्णालयात हलविण्यात येईल. जनतेने पाऊस, वारा सुरू असताना मोबाईलवरून फोटो, व्हिडिओ काढू नयेत, असे आवाहन करून जिल्हा प्रशासनाच्या या तयारीला नागरिकांचे सहकार्य राहिल्यास या आपत्तीला आपण यशस्वीरित्या सामोरे जाऊ, असा विश्वास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील 62 गावे, तसेच खाडी किनाऱ्यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात दि.17 मे रोजी सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
000