अलिबाग,जि.रायगड,दि.17 (जिमाका):- तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणांनी सुरक्षा उपाययोजना राबविण्यासाठी कंबर कसली आहे. नगरपंचायत खालापूर हद्दीत काही प्रमाणात घरांचे पत्रे आणि कौले उडून नागरिकांचे नुकसान झाले आहे, 5 मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. नगरपंचायतीने सर्व तुटलेली झाडे बाजूला केली आहेत.
या नगरपंचायत क्षेत्रात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही वा प्राणी-पशू यांना इजा झालेली नाही. काल रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला असला तरी, नगरपंचायतचे विद्युत कर्मचारी व इतर कर्मचारी विजेच्या तारांवर पडलेल्या झाडांच्या फांद्या काढण्यासाठी कार्यरत आहेत. महावितरणशी देखील संपर्क केला असून त्यांच्या मदतीने लवकरच नगरपंचायत क्षेत्राचा वीजपुरवठा सुरळीत होईल अशी महिती खालापूर नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिली.
मात्र अजूनही नागरिकांनी घराबाहेर पडू नये, विजेचे खांब, झाड, जुनी घरे, जुनी इमारत याच्या जवळपास थांबू नये, असे आवाहन मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी नागरिकांना केले आहे.
000