वाशिम, दि. १७ (जिमाका) : आगामी काही दिवसात कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. या लाटेविरुद्ध लढण्यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर बेडची संख्या वाढविण्यासोबतच आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत आज ते बोलत होते.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेडची संख्या वाढविण्याचे नियोजन करावे. आवश्यकता भासल्यास तालुकास्तरावर सुद्धा ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी. तसेच तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने शासकीय रुग्णालयामध्ये कोरोना बाधित लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. याठिकाणी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करावा. तसेच ऑक्सिजन साठवणुकीसाठी आणखी सुविधा निर्माण करण्यासाठी नियोजन करावे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरुद्ध लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
आगामी खरीप हंगाम लक्षात घेवून जिल्ह्यात कृषि सेवा केंद्र, कृषि उत्पन्न बाजार समिती सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली असून याठिकाणी गर्दी होवू नये, यासाठी नियोजन करावे. कृषि विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बांधावरच बियाणे, खते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी ग्रामसेवक, तलाठी यांचीही मदत घ्यावी. शेतकऱ्यांना बांधावरच बियाणे, खते उपलब्ध झाल्यास कृषि सेवा केंद्रांवर होणारी गर्दी टाळता येईल, असे पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजनचा पुरवठा, नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी, वादळ व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान याचाही पालकमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी नियोजन सुरु असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून जिल्हा स्त्री रुग्णालय येथे आणखी १०० बेड व कारंजा उपजिल्हा रुग्णालयात आणखी ५० बेड वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात कोरोना बाधित लहान मुलांवर उपचारासाठी ५० बेडचा स्वतंत्र कक्ष सुरु करणे, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व ऑक्सिजन टँक उभारण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत म्हणाल्या, ग्रामीण भागातील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. तसेच कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) त्यांची कोरोना चाचणी करण्यावर विशेष भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, बाजार पेठेत गर्दी होवू नये, यासाठी पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.