नवी दिल्ली, दि. ३ : वेगवेगळ्या टप्प्यांवर शिक्षण पद्धतीत होत गेलेले कालसुसंगत बदल व त्याच्या अंमलबजावणीमुळे सुसंस्कृत समाज निर्माण होण्यास मोलाची मदत झाली, असे मत प्रसिद्ध लेखिका डॉ. छाया महाजन यांनी आज व्यक्त केले.
“बदलती शिक्षण पद्धती” या विषयावर डॉ. महाजन महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ४७वे पुष्प गुंफताना बोलत होत्या.
उपनिषद काळापासून भारतामध्ये शिक्षण क्षेत्रात होत आलेल्या कालपरत्वे बदलांनी येथील समाज जीवनावर चांगले-वाईट परिणाम झाले.औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षणाला महत्व आले. भारत देशावर झालेले विविध आक्रमण, ब्रिटीशांची सत्ता व स्वातंत्र्योत्तर भारत अशा स्थित्यंतरात शिक्षण पद्धतीतही बदल होत गेले, अधिकाधिक लोकांपर्यंत शिक्षण पोहचल्याने समाज सुसंस्कृत झाल्याचे डॉ. महाजन म्हणाल्या.
उपनिषद काळात ठराविक वर्गापुरतेच मर्यादित असलेले शिक्षण व पुढे आर्यांच्या काळात सर्व वर्गांसाठी खुले झालेले शिक्षण व यातून समाज जीवनावर झालेला बदल याचे विश्लेषण डॉ. महाजन यांनी केले. भारतदेशावर झालेल्या इस्लामी आक्रमणांचाही येथील शिक्षण पद्धतीवर परिणाम झाला आणि ज्ञानभाषेवर संस्कृतसह अरबी, फारशी भाषांचा प्रभाव पडला. ब्रिटीशांपूर्वी भारतात आलेल्या युरोपियन लोकांनी त्यांची शिक्षण पद्धती येथे रूजविण्यासाठी केलेले प्रयत्न व त्याचा परिणाम यावर डॉ. महाजन यांनी प्रकाश टाकला.
ब्रिटीशांचे भारतात आगमन झाले आणि त्यांनी हळूहळू येथे आपल्या सत्तेचा विस्तार सुरु केला त्यांच्या कारभारासाठी आवश्यक मनुष्यबळ मिळविण्याकरिता त्यांनी भारताचे सर्वेक्षण केले व येथील शिक्षणाचा मागोवा घेतला.लॉर्ड मेकॉले, वॉरन हेस्टींग आणि चार्ल्स वूड यांनी भारतातील शिक्षण पद्धतीत विज्ञान, तत्वज्ञान आदी विषय आणले. याच काळात पगारी शिक्षकांची प्रथा येथूनच सुरु झाली व भारतातील आधुनिक शिक्षणाला सुरुवात झाल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले. मेकॉलेच्या सुधारणावादी शैक्षणिक विचारांना राजाराम मोहनरॉय, दादाभाई नौरोजी यांनी पाठिंबा दिला तसेच महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण,अस्पृश्य व तळागाळातील समाज घटकांच्या शिक्षणाचा आग्रह धरला असेही डॉ. महाजन म्हणाल्या. युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांतीचे लोन भारतात पसरले व त्याचाही परिणाम येथील शिक्षण पद्धतीवर झाला.
स्वतंत्र भारतात पंतप्रधान पंडित नेहरुंनी देशाचे शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी आयोग नेमला व याद्वारे विशाल भारताचे स्वप्न प्रतिबिंबीत होणारे, श्रमसंस्कृती व व्यवसायिक शिक्षण, नैतिकमूल्यांवर आधारित शिक्षण रूजविण्यास सुरुवात झाली.
िकालानुरूप बदलांमुळे भारतातील शिक्षण पद्धत विकसीत होत गेली व पर्यायाने येथील समाजात सकारात्मक परिवर्तन घडत गेले. हा प्रवास आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापर्यंत येवून पोहचल्याचे सांगून सद्याच्या कोरोना महामारीमुळे शाळेपासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना व येणाऱ्या पिढ्यांनाही पूर्ववत पद्धतीनुसार शिक्षणाचा लाभ घेता यावा अशा भावना डॉ. महाजन यांनी व्यक्त केल्या.
०००००
रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.१५७/ दिनांक ०३.०८.२०२१