मालेगाव, दि. 06 (उमाका वृत्तसेवा): राज्यातील निसर्गाचा लहरीपणा आपण सर्व अनुभवत आहोत, एकाबाजूला अत्यल्प पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे, तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त परिस्थितीचा सामना माझे शेतकरी बांधव करीत आहेत. नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन कटिबद्ध असून, निसर्गाचा हा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.
एस फाऊंडेशन मार्फत ज्येष्ठ गुरूजनांचा सत्कार सोहळा तसेच वृक्षारोपण पंधरवाड्याच्या अनुषंगाने पंचायत समितीच्या आवारात मंत्री श्री.भुसे यांच्याहस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा देसाई, विजय देसाई, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वनाथ शिंदे, संजय दुसाणे, गट शिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे, कृषी अधिकारी किरण शिंदे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एस फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोनाच्या संकट काळात नागरिकांच्या प्रबोधनासाठी पथनाट्याच्या माध्यमातून व्यापक स्वरुपात जनजागृतीचे महत्वपूर्ण काम झाल्याचे सांगतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, आपल्यामार्फत वृक्षारोपणाचे चांगले काम उभे राहीले आहे. मात्र आपण झाडे किती लावली, यापेक्षा झाडे किती जगवली याला महत्व दिल्यास खऱ्या अर्थाने वृक्षारोपणाचा उद्देश सफल होईल. ऑक्सिजनचे महत्व कोरोनामुळे अधोरेखीत झाले असून, तालुक्यातील सर्व शाळा परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्व पटवून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. उपस्थित सर्व गुरूजनांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात मोलाचा सहभाग दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देतांना तालुक्यातील गोरगरीब नागरिकांची मुले आपल्या शाळेत येतात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासह संभाव्य तिसऱ्या लाटेला परतवून लावण्यासाठी महत्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहनही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले.
2021 वर्ष ठरेल मालेगावचे विकास पर्व
विकास कामांना गती देणारे तालुक्यातील काँक्रीट रस्ते, दुभाजक, पथदिव्यांसह रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे, भुमिगत गटार, रस्ता रुंदीकरण, पुलांचे बांधकाम, मराठी शाळांचे नुतणीकरण व सुशोभिकरण, सामाजिक सभागृह आदि विकास कामांसाठी नगर विकास विभागामार्फत मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या विकास कामांचाही शुभारंभ आज करण्यात येत आहे. यानिमीत्ताने संपूर्ण मालेगाव तालुक्याच्या विकासकामांसाठी 2021 हे वर्ष विकासपर्व ठरेल असा विश्वासही राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.
0000