मुंबई, दि. १२ : मुंबईमध्ये महिला सुलभ सुविधा निर्माण करणे, महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करणे, वर्कींग वुमनसाठी हेल्पलाइन, रेंटल हाऊसिंग आदी सुविधा निर्माण करणे, चाळी आणि झोपडपट्टीमधील महिलांसाठी सुविधा, रोजगार आदी संधी उपलब्ध करणे, महिलांसाठी शौचालये अशा विविध अनुषंगाने आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. शहराच्या विकास आराखड्यात महिलासुलभ विकासाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीस मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार, उपायुक्त रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, ॲडव्हायझरी कमिटी फॉर जेंडरच्या नंदिता शहा, अमिता भिडे, प्राची मर्चंट, डब्ल्यूआरआयचे धवल आशर, तनुश्री व्यंकटरमण, आकांक्षा अग्रवाल, earnst & young चे मणी मेहरोत्रा, रोहित लाहोटी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील वापरात नसलेल्या जागांचा विकास करणे, याठिकाणी विविध लोकोपयोगी सुविधांची निर्मिती करणे या अनुषंगानेही सादरीकरण करण्यात आले. मुंबई शहराचा सर्वांगिण विकास करताना त्यात महिलांना विविध सुविधांची उपलब्धता होणे, सुरक्षीततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करणे या बाबींवर भर दिला जाईल, असे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेस चालना
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबतही आज बैठक घेण्यात आली. राज्याचा पर्यावरणपूरक विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सौर ऊर्जेचा वापर महत्त्वाचा असून समृद्धी महामार्गावर यासाठी चालना देण्यात येत आहे. बैठकीत या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक सुरज वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमईआरसीचे श्री. आंबेकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
000