मुंबई, दि.२५ : – जलजीवन मिशन अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रस्तावित नळ पाणीपुरवठा योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने सादर करावे असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत नेवासा तालुक्यात जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेमार्फत २०२१-२२ च्या कृती आराखड्यात समाविष्ट योजनांचे अंदाजपत्रक तातडीने सादर करावे अशा सूचनाही मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जल जीवन मिशन अंतर्गत ५ कोटी रुपयांच्या वरील कामांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सर्वेक्षण व प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी राज्य स्तरावर प्रादेशिक विभागनिहाय एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हा परिषदेकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची नेमणूक शासनामार्फत पुढील आठ दिवसात करण्यात येईल.ही नेमणूक झाल्यावर मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर संबंधित सल्लागारांसमवेत बैठक आयोजित करण्यात येऊन कामांना गती देण्यात येईल असेही यावेळी ठरविण्यात आले.
या बैठकीस मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, पाणीपुरवठा विभागाचे सहसचिव तसेच जल जीवन मिशनचे प्रभारी अभियान संचालक प्रवीण पुरी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अहमदनगरचे कार्यकारी अभियंता विजय वाईकर,जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, उपविभागीय अभियंता एस एस दहिफळे उपस्थित होते.
000