नांदेड (जिमाका) दि. 30 :- बदलत्या काळानुरूप कार्यालयातील कामकाजाच्या कार्यपद्धती या नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमाशी निगडीत होत चालल्या आहेत. याच्याशी अधिक सुसंगत कार्यालयीन रचना साध्य करण्यासाठी कार्यालयातील रचना व वास्तू स्थापत्त्य त्याला पूरक असणे गरजेचे झाले आहे. जनतेची कामे वेळेत पूर्ण व्हावी, निर्णय प्रक्रिया तात्काळ व्हावी यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिगचे माध्यम अत्यंत प्रभावी ठरले असून तशी व्यवस्था असलेल्या कार्यालयाची रचना हदगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाने परीपूर्ण करुन दाखविल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
हदगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी खासदार सुभाष वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, हदगाव नगरपरिषदेच्या अध्यक्षा ज्योती राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
शासकीय इमारत म्हणजे ठरावीक साच्यातील बांधकाम आजवर प्रचलित होते. यात तेवढ्याच खर्चात चांगल्या आणि देखण्या इमारतीही उभ्या राहू शकतात यासाठी नव्याने आराखड्याचा मी आग्रह धरला. तेवढ्याच खर्चात जिल्ह्यातील विविध शासकीय इमारती आता नव्या आकर्षक स्वरुपात पूर्ण झाल्याने कार्यालय परिसरासह काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही नवा विश्वास मिळत असून जनतेलाही आता नवीन पद्धतीचे कार्यालय आपली वाटू लागली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनतेची कामे वेळेवर पूर्ण व्हावी असा आग्रह मी सातत्याने धरला आहे. यासाठी लागणारे आवश्यक ते सर्व तंत्रज्ञान शासनातर्फे जिल्ह्यातील कार्यालयांना उपलब्ध करुन दिले जात आहे. कार्यालयीन कामकाजात गती यामुळे शक्य झाली आहे. जी अपेक्षा शासकीय कार्यालयांकडून आहे तीच अपेक्षा शासनाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडून असल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. दिलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी पुढे सरसावले पाहिजे. जे कंत्राटदार चांगले काम करत आहेत अशा कंत्राटदारांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहनही देऊ, मात्र कामे घेऊनही जे कंत्राटदार कामे करीत नाहीत अशांविरुद्ध कारवाई करु अशा इशाराही त्यांनी दिला.
नांदेड जिल्ह्यात आपण जवळपास 5 हजार कोटींची कामे मंजूर केली आहेत. या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. उपलब्ध असलेल्या निधीतून ही कामे प्राधान्यक्रमानुसारच पूर्ण करुन विकास कामात मागील काही वर्षात जे दूर्लक्ष झाले होते त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत मी सार्वजनिक बांधकाम विभागाची सुत्रे स्विकारल्यानंतर 248 किमी लांबीचे रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यामध्ये दर्जोन्नत करण्यात आले आहेत. अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये विविध योजनेच्या माध्यमातून हदगाव मतदारसंघासाठी एकुण 43 कामांना रुपये 146.35 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतल्याची माहिती त्यांनी दिली. विविध रस्ते, पूल, इमारतीसाठी शासनाच्या विविध योजनेतून आजपर्यंत एकुण 96 कामांसाठी 182.73 कोटी रक्कम मंजूर केली असून ही कामेही तेवढीच दर्जदार होतील अशा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी प्रास्ताविक केले.