मुंबई,दि. 27 : केरळ येथे शबरीमला उत्सव साजरा करण्याकरीता जाणाऱ्या भाविकांनी तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रवासी वाहनातूनच प्रवास करावा,असे आवाहन मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यभरातून अनेक भाविक केरळला शबरीमला उत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. त्यामुळे सर्वांनाच रेल्वेचे तिकीट उपलब्ध होणे शक्य नसल्याने ते रस्ते मार्गाने प्रवास करण्याचा पर्याय निवडतात. अशावेळी इतक्या लांबच्या प्रवासासाठी कोणताच बिघाड नसलेले वाहन असणे गरजेचे आहे. वाहन तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्यास अपघात होण्याची शक्यता असते. अशा दुर्घटना टाळण्यासाठी भाविकांनी तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रवासी वाहनातूनच प्रवास करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईच्या प्रादेशिक परिवहन विभागाकडून याबाबत दक्षता घेतली जात असून प्रवासी तसेच भाविकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
०००००