मुंबई, दि. 26 : बी.डी.डी चाळीच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प वेगाने पूर्ण करणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
श्री.पाटील यांनी म्हाडाला भेट देऊन त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली. यावेळी मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर,मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण,उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर आणि म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गृहनिर्माण प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्यासच सदनिकाधारकांना दिलासा मिळू शकतो हे लक्षात घेऊन म्हाडाने त्यांच्या विविध प्रकल्पांच्या कामाला गती द्यावी, अशा सूचनाही श्री.पाटील यांनी दिल्या.
म्हाडाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देणारे सादरीकरण बैठकीत करण्यात आले. यामध्ये म्हाडाच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रादेशिक मंडळांसह प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. म्हाडाने आतापर्यंत विकसित केलेले गृहनिर्माण प्रकल्प,गिरणी जमिनींचा विकास,बी.डी.डी चाळींच्या पुनर्बांधणीची सद्यस्थिती,मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे कार्य,मुंबईतील धोकादायक इमारती,उपकरप्राप्त इमारतींचे वर्गीकरण,म्हाडाने पुनर्रचित केलेल्या इमारती,पुनर्विकासात येणाऱ्या अडचणी अशा विविध विषयांवर बैठकीत माहिती देण्यात आली.
००००
डॉ.सुरेखा मुळे/विसंअ/26.12.2019