अवैध सावकारीविरुद्ध कारवाई टाळणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या शिफारसीसाठी समिती – जयंत पाटील

नागपूर,दि. 20:राज्यातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी व अशा सावकारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी विधानपरिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणा सहकारमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे केली.

          

विधान परिषदेत सदस्य श्रीमती विद्या चव्हाण यांनी नियम 93 अन्वये अवैध सावकारीसंदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकाळ चर्चेला उत्तर देताना श्री. पाटील बोलत होते.

          

श्री. पाटील म्हणाले की,माजी मंत्री आर.आर. पाटील यांनी अवैध सावकारी विरोधात कायदा आणला. या कायद्याची कडक अमंलबजावणी करण्याच्या सूचना सर्व जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत. मात्र,अवैध सावकरांविरुद्ध सहकार विभागातील जिल्हा उपनिबंधक कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी गंभीर आहेत. अशा अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी तसेच अवैध सावकारी कायद्यात सुधारणा सुचविण्याचे काम ही समिती करणार आहे. या समितीमध्ये विधानपरिषद सदस्य सर्वश्री ख्वाजा बेग,सुरेश धस,गिरीश व्यास यांचा समावेश असेल. अवैध सावकारांना जरब बसविण्यासाठी या समितीने सुचविलेल्या सुचनांची समावेश कायद्यात करण्यात येईल.

सदस्य सर्वश्री ख्वाजा बेग,सुरेश धस,गिरीश व्यास यांनी या चर्चेत सहभाग घेतला.