गोसेखुर्दच्या धर्तीवर धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे काम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गोंदिया जिल्हा आढावा बैठक 

नागपूर, दि. 19 : गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा सिंचन प्रकल्पामुळे 9 तालुक्यातील 227 गावांना फायदा होणार आहे. सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाचे काम गोसेखुर्दच्या धर्तीवर पूर्णत्वास नेण्याचा शासनाचा मानस आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

विधीमंडळ परिसरातील मंत्री परिषद कक्ष येथे गोंदिया जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. बैठकीला विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे, आमदार सर्वश्री विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रीकापूरे, सहसराम कोरोटे, राजू कारेमोरे, नरेंद्र भोंडेकर आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील धापेवाडा सिंचन प्रकल्पामुळे 90 हजार हेक्टरवर सिंचनाची सोय होणार आहे. या प्रकल्पाला त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. अवकाळी पावसाबाबत मदत, पिकांचे पंचनामे आदींबाबत तक्रारी असल्यास जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर त्वरीत निकाली काढाव्यात. गोंदिया येथील मेडिकल कॉलेजचे काम लवकरात लवकर कालबद्ध कार्यक्रमानुसार करण्यात येईल. तसेच गडचिरोलीच्या धर्तीवर जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तरुणीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले

तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हानिहाय होणाऱ्या बैठका हा एक चांगला उपक्रम आहे. स्थानिक पातळीवरचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी अशा बैठकांचे आयोजन राज्याच्या इतरही भागात करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या निधीकरिता मुंबई येथे त्वरित बैठक घेण्यात. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. येत्या दोन-तीन वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास करण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री यांनी जलसंधारण, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प, कृषिपंप वीज जोडणी, प्रधानमंत्री आवास योजना, वनहक्क पट्टे आदी विषयांचा आढावा घेतला.