नागपूर, दि. 19 : तांदूळ उत्पादक जिल्ह्यातील सन 2012-13 कालावधीत राईस मिलकडे शिल्लक राहिलेल्या तांदूळप्रकरणी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने तोडगा काढून प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिल्या.
विधानभवनात श्री.पटोले यांच्या उपस्थितीत यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.
श्री.पटोले म्हणाले, धान उत्पादक शेतकऱ्यांचा तांदूळ, राईस मिलकडे शिल्लक राहिल्याप्रकरणी प्रशासनाने मार्ग काढणे गरजेचे आहे. अन्नधान्य ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याची हानी होऊ नये याबाबत दक्षता घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पुढील नवीन वर्षापासून तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या मालाचा मोबदला आणि साठवणुकीची व्यवस्था उपलब्ध होईल असे नियोजन करावे. तसेच शेतकरी हिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. तांदूळ उत्पादक जिल्ह्यातील सन 2012-13 कालावधीत राईस मिल्सकडे शिल्लक राहिलेल्या तांदूळप्रश्नी व प्रलंबित असलेली वसुली आणि तांदूळ उत्पादनासाठीच्या शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही श्री.पटोले यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सतीश सुपे, वित्त विभागाचे उपसचिव बि.धांडे, मार्केटिंग फेडरेशनचे महाव्यवस्थापक श्री.नेरकर, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सरोदे, गोंदियाचे जिल्हा पुरवठा अधिकारी आदी उपस्थित होते.