नवी दिल्ली, 18 : प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही‘ या काव्य संग्रहास वर्ष 2019 साठीचा सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर झाला.
साहित्य अकादमीच्या वतीने आज वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे देशातील 23 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांच्या नावांची घोषणा केली. कवयित्री अनुराधा पाटील यांच्या’कदाचित अजूनही‘ या काव्य संग्रहाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली.
‘कदाचित अजूनही‘ या काव्यसंग्रहाविषयी…
आपल्या प्रतिभेद्वारे मराठी कवितेवर स्वतंत्र मुद्रा उमटविणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांचा’कदाचित अजूनही‘ हा पाचवा काव्यसंग्रह आहे. या काव्य संग्रहातील कवितांच्या माध्यमातून त्या संयत विवेकशील सुरात माणसातल्या चांगुलपणाला आवाहन करतात. या सगळ्या कविता मिळून त्या मानवजातीसाठी एक प्रार्थनाच जणू करीत आहेत. या संग्रहातील कविता स्त्री दु:खाची दुखरी नस नेमकी पकडून संवादी होतात. या काव्यसंग्रहात राने-वने, झाडे-झुडपे, नद्या-समुद्र-वारे, चंद्र-सूर्य असा निसर्ग मोठ्या प्रमाणावर येतो. या सर्व कविता ग्रामीण संस्कृती, शेती संस्कृती आणि एतद्देशीय पंरपरेशी घट्ट नाते सांगणाऱ्या आहेत. बदलत्या ग्रामीण जीवनाचे चित्रण या काव्यसंग्रहात असून गावाकडील जीवनाच्या नव्या दु:खी कंगोऱ्यांचे तटस्थ दर्शनही घडते. मुंबई येथील शब्द प्रकाशनाने ‘कदाचित अजूनही‘ हा 128 पृष्ठांचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.
अनुराधा पाटील गेल्या 40 वर्षांपासून सातत्याने कविता लिहत आल्या असून‘दिगंत’, ‘दिवसेंदिवस’, ‘तरीही’, ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ हे त्यांचे प्रसिद्ध काव्य संग्रह आहेत.
या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून पुढील वर्षी 25 फेब्रुवारी 2020 रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे, लक्ष्मण माने आणि वासुदेव सावंत यांचा समावेश होता.
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.270/ दिनांक 18.12.2019